मुंबई : मध्य रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे स्थानकावर एक अंध प्रवासी लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला. त्यामुळे तो फलाट आणि लोकलच्या फटीत पडला. ही घटना शुक्रवारी रात्री ८.०२ वाजता घडली. जखमी अवस्थेतील प्रवाशाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता, त्याला मृत घोषित केले.

नुकताच मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेला एक आठवडापूर्ण होत नाही तोच घाटकोपर रेल्वे स्थानकात हा अपघात झाला. लोकलमधून उतरताना प्रवाशाचा तोल गेला आणि लोकल आणि फलाटामधील पोकळीत प्रवासी पडला. शुक्रवारी सायंकाळी ७.४४ वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्थानकातून ठाण्याला जाणारी धीमी लोकल रात्री ८ च्या सुमारास घाटकोपर स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर आली असता ही घटना घडली. या घटनेने घाटकोपर स्थानकात प्रचंड गर्दी जमली. घटनास्थळी रेल्वे पोलीस, आरपीएफ, गृहरक्षक पोहचून त्यांनी गर्दी हटवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर, जखमी अवस्थेतील प्रवाशाला पोकळीतून बाहेर काढून त्याला वाचण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र त्याला काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवाशाला रात्री ८.३५ वाजता राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संजय मातंगे (५१) असे प्रवाशाचे नाव असून ते बदलापूर येथील रहिवासी आहेत. ते १०० टक्के अंध असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यांच्याकडे आर्मी कॅन्टीनचे कार्ड मिळाले असून त्याच्या वारसांशी संपर्क साधण्यात आलेला आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.