मुंबई: म्हाडा पुणे मंडळाची १५ डिसेंबर रोजी नियोजित असलेली सोडत मंगळवारी अचानक रद्द केली आहे. नव्या बदलासह आणि नव्या संगणकीय प्रणालीसह सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोकण आणि पुणे मंडळाची सोडत एकाच वेळी काढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यानिमित्ताने म्हाडाच्या कारभारातील गोंधळ प्रकर्षाने समोर आला आहे.
मागील चार वर्षांपासून मुंबईकर म्हाडाच्या सोडतीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र मुंबई मंडळाची सोडत काही मार्गी लागताना दिसत नाही. अशात आता सोडत प्रक्रियेत नवीन बदल केले जात असल्याने आणि नवीन संगणकीय प्रणाली विकसित केली जात असल्याने मुंबई मंडळाने या दोन्ही बाबी अंतिम झाल्यानंतरच नव्या बदलासह, नव्या प्रणालीसह सोडत काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईकरांची प्रतीक्षा लांबणार आहे. असे असताना मुंबईकरांना कोकण मंडळाच्या सोडतीच्या निमित्ताने मुंबई महानगर प्रदेशात घरे घेण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे कोकण मंडळाची सोडतही मुंबईकरांसाठी महत्त्वाची असते. मात्र ही सोडतही नव्या बदलासाठी, नव्या प्रणालीसाठी थांबविण्यात आली आहे.
मुंबई आणि कोकण मंडळाची सोडत लांबली असताना पुणे मंडळाने मात्र गुरुवारी ३९३० घरांच्या सोडतीचा कार्यक्रम जाहिर केला होता. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळही घेतली होती. वेळापत्रकही निश्चित केले होते. मात्र आता मंगळवारी ही सोडत रद्द करण्यात आली आहे. पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नव्या बदलासह आणि नव्या संगणकीय प्रणालीसह पुणे आणि कोकण मंडळाची एकत्रित सोडत काढण्याचे आदेश देऊन सोडत पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सोडत प्रक्रियेतील बदल आणि नवीन संगणकीय प्रणाली अंतिम होण्यास किती दिवस लागणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे आता मुंबई, कोकण आणि पुणे मंडळाची सोडत किती दिवस, महिने लांबणार असा प्रश्न उपस्थित झाला असून इच्छुकांचा विरस झाला आहे.