मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्यासाठी येत्या शुक्रवारी आझाद मैदानावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कबुतरखान्यांवरुन सुरु असलेला वाद तसेच सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांबाबत दिलेल्या अलीकडील निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी ही मोर्चा काढला जाणार आहे.
मोर्चा शांततामय पद्धतीने होणार असून प्राण्यांवर अन्याय होणाऱ्या निर्णयांना विरोध व्यक्त करणे आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी कडक कायदे करण्याची मागमी मांडणे हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. दरम्यान, मूक मोर्चादरम्यान सहभागी मंडळी हातात फलक घेऊन ‘प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे, भटक्या प्राण्यांचे पुनर्वसन करा असे संदेश देणार आहेत. मोर्चा पूर्णपणे शांततामय असेल, तसेच नागरिकांना प्राण्यांच्या कल्याणासाठी सजग करण्यावर भर दिला जाईल, असे प्राणीप्रेमी रेश्मा शेलटकर यांनी सांगितले.
वादग्रस्त आदेश आणि कबुतरखान्यांचा मुद्दा
या मूक मोर्चाचा केंद्रबिंदू दोम महत्त्वाच्या विषयांवर आहे. पहिला म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या भटक्या श्वानांबाबतचा आदेश. या आदेशात भटक्या श्वानांना पकडून कायमचे हटवण्याची परवानगी देण्यात आली आहे, ज्यामुळे प्राणीप्रेमींच्या मते प्राण्यांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. दुसरा मुद्दा म्हणजे शहरातील कबुतरखान्यांवरुन सुरु असलेला वाद.
मोर्चाचे उद्दिष्ट आणि मागण्या
या मोर्चाचा उद्देश प्राण्यांवरील अन्यायकारक निर्णयांना विरोध करणे आणि प्राणी संरक्षणासाठी कडक व प्रभावी कायदे करण्याची मागणी. या मोर्चात अनेक स्वतंत्र कार्यकर्ते, पशुवैद्य आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत, असे आयोजकांनी सांगितले.
पूर्वीची आंदोलने आणि प्रतिसाद
यापूर्वी २०१९ आणि २०२२ मध्येही अशा प्रकारचा मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी शासनाकडे प्राण्यांच्या हक्कांबाबत निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, अनेक मागण्या प्रलंबित आहेत.