Baba Siddique Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी पोलिसांनी दोघांना अटक केली. मात्र, यावेळी एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. दरम्यान, या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या घटनेबाबत मुंबई पोलिसांनी घटनेचा तपशील उघड केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची योजना तीन महिन्यांपासूनच सुरु झाली होती. बाबा सिद्दीकी यांच्या घरी आरोपी शस्त्राशिवाय अनेक वेळा गेले होते. तसेच या हत्येचे संपूर्ण नियोजन पुण्यात झाले होते. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत १५ हून अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत.

हेही वाचा : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण: जुहू बीचवर काढलेल्या ‘त्या’ फोटोमुळे आरोपी अडकले; तिसऱ्या फरार साथीदाराचीही ओळख पटली!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला चौथा आरोपी हरीश हा मध्यस्थ म्हणून काम करायचा. तर अटक आरोपी प्रवीण आणि शुभम लोणकर (फरार आरोपी) यांनी अटक केलेल्या शूटर गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांना दोन लाख रुपये दिले होते. चौथा आरोपी हरीश याच्यामार्फत पैसे देण्यात आल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे.

गोळीबार करणाऱ्यांना पैशांसह दोन मोबाईल दिले होते

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात गोळीबार करणाऱ्यांना दोन मोबाईलसह पैसेही दिले होते. हरीश गेल्या ९ वर्षांपासून पुण्यात राहत होता. आरोपीने चॅटिंग आणि कॉल करण्यासाठी सोशल मीडिया ॲपचा वापर केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप हे आरोपी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शूट करायला शिकले, अशी माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोळीबाराचा सराव अन् कॉलिंगसाठी इन्स्टाग्रामचा वापर

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या घटनेबाबत पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी तीन महिन्यांपूर्वी कट रचला होता. तसेच व्हिडीओ पाहून आरोपी शूट करायला शिकले होते. तसेच आरोपींनी चॅटिंगसाठी स्नॅप चॅट ॲपचा वापर केला होता आणि कॉलिंगसाठी इन्स्टाग्रामचा वापर केला होता. तसेच आरोपी गोळीबाराचा सरावही करत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.