मुंबई: इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर प्रभू श्रीरामांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पध्दतीने सापळा लावून पकडले. या तरूणाचा शोध घेण्यासाठी एका मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवून मैत्री केली. त्यानंतर त्याला भेटण्यासाठी बोलावून सापळा लावून पकडले. वाकोली पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून नोटीस बजावली आहे.

प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट

पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी अजित यादव (२४) हा सांताक्रूझ (पूर्व) येथील रहिवासी असून बजरंग दलाचा सदस्य आहे. त्याने २९ सप्टेंबर रोजी पहाटे साडेबारा वाजता इंस्टाग्रामवर मिस्टर बादशाह ऑफिशिअल (‘mr_badshah_official’) या हँडलवरून केलेली एक पोस्ट पाहिली. या अकाऊंटवर ‘मुंबई टीव्ही’ या न्यूज अकाऊंटवरून आय लव्ह मोहम्मद (‘I Love Muhammad’) या संदर्भातील व्हिडिओ सामायिक करण्यात आला होता. त्याखाली प्रभू श्रीरामांविषयी अवमानकारक शब्द लिहिले होते.

बनावट खाते बनवून घेतला शोध

पोस्टकर्ता कोण त्याची ओळख पटत नव्हती. त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यासाठी यादव आणि त्याच्या मित्राने अर्पिता विश्वकर्मा या मुलीच्या नावाने बनवाट इन्स्टाग्राम खाते तयार केले. या खात्यावरून संबंधीत व्यक्तीला रिक्वेस्ट पाठविण्यात आली. आरोपीने ती स्वीकारली. त्याच्याशी मैत्री केली. त्यांच्यात सुमारे १० ते १२ दिवस संभाषण झाले. या काळात आरोपीने स्वतःचा मोबाईल क्रमांक शेअर केला. आरोपी या सापळ्यात बरोबर फसला होता.

भेटीसाठी बोलावले आणि पकडले

त्यानंतर फिर्यादीने त्याच्याशी भेट ठरवली आणि अंधेरी (पूर्व) येथील अगरकर चौकात भेटण्याचे ठरले. फिर्यादी यादव आपल्या तीन मित्रांसह ठिकाणी पोहोचला आणि त्याला पकडण्यासाठी सापळा लावला. आरोपी तिथे आला. त्याला इंस्टाग्राम अकाऊंट उघडण्यास सांगण्यात आले आणि त्याच अकाऊंटवरून आक्षेपार्ह पोस्ट झाल्याची खात्री पटली.

आरोपी २३ वर्षांचा असून तो चेंबूर येथे राहतो. कुलाबा येथील एका सुगंधी द्रव्यांच्या दुकानात काम करतो.

वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा

आपण पकडलो गेल्यासे समजताच त्या तरूणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादी आणि त्याच्या मित्रांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. वाकोला पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएश) कलम १९६ (धर्म, जाती, भाषा, जन्मस्थान यांच्या आधारावर वैमनस्य निर्माण करणे) आणि २९९ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेले कृत्य) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.