मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यंदा बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना दिवाळीनिमित्त ५ हजार रुपये भाऊबीज भेट देण्याची घोषणा केली. घोषणा होण्यापूर्वी एका महिन्यापासून याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, भाऊबीज एका दिवसावर येऊन ठेपली तरीही बालवाडी सेविकांना ५ हजार रुपये भाऊबीज भेट आणि वेतन मिळालेले नाही. त्यामुळे बालवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बालवाडी सेविकांना तातडीने भाऊबीज भेट आणि वेतन द्यावे, अशी मागणी श्रमिक भारतीय युनियनतर्फे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
दिवाळी जवळ येताच महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचारी – कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी मुंबई महानगरपालिकेतील सर्वच कर्मचारी संघटनांनी आयुक्तांकडे केली होती. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गेल्या आठवड्यात पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. त्याचबरोबर, भाऊबीज म्हणून सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना १४ हजार रुपये, तर बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना ५ हजार रुपये भेट स्वरूपात देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
मात्र, ही भेट मिळण्यात विलंब झाल्याचे श्रमिक भारतीय युनियनचे म्हणणे आहे. बालवाडी सेविकांचे वेतन दर महिन्याच्या ७ ते १० तारखेच्या आत देण्याचे आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे, याबाबत युनियनने महापालिका आयुक्तांना ई – मेलद्वारे पत्र पाठविले आहे. वेतन देण्यात होणारा विलंब अत्यंत गंभीर बाब आहे. यामागे प्रशासनाची उदासीनता, असंवेदनशीलता आणि दुर्लक्ष दिसून येते, अशी टीका युनियनने केली आहे.
बालवाडी सेविकांना (शिक्षक मदतनीस) भाऊबीज भेट आणि गेल्या महिन्याचे प्रलंबित वेतनह तातडीने अदा करावे, यापुढे अशा प्रकारचा विलंब होऊ नये, यासाठी स्पष्ट कार्यपद्धती आणि वेळापत्रक जाहीर करावे, आदी मागण्या युनियनने पत्रात नमूद केल्या आहेत. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युनियनने दिला आहे.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या बालवाडीत कार्यरत असलेल्या शिक्षक मदतनीस गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत अल्प मोबदल्यातही निःस्वार्थपणे कार्यरत आहेत. तसेच, दिवाळी साजरी करण्यासाठी आर्थिक स्थैर्य असणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांना वेळेवर पैसे मिळाले पाहिजेत, असे मत श्रमिक भारतीय युनियनचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी व्यक्त केले.