मुंबई : वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये मंगळवारी पहाटे ४ वाजता लागलेली भीषण आग तब्बल २२ तासांनी मंगळवारी मध्यरात्री विझली. अग्निशमन दलाचे ७६ अधिकारी, २७३ जवान या आगीशी २२ तास झुंज देत होते. ही आग विझवण्यासाठी ५४ अग्निशमन वाहने, ७३ श्वसन उपकरणे आदींचा वापर करण्यात आला. बुधवारी २ फायर इंजिन, २ जंबो टँकर आदींसह मुंबई अग्निमशन दलाची यंत्रणा कार्यरत होती व मॉलवर पाणी मारून तापमान कमी करण्याचे काम केले जात होते.
तळघरात तीन मजले, तळमजला आणि वर तीन मजले अशा स्वरुपाचा हा मॉल आहे. तळघरात खालचे दोन मजले वाहनतळ आहे. या मॉलमधील तळघरातील क्रोमाच्या मोठ्या दुकानाला ही आग लागली होती. मात्र काही वेळाने ही आग संपूर्ण मॉलमध्ये पसरली. संपूर्ण मॉलमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या होत्या. आग मॉलच्या तळघरातील तीन मजल्यांवर, तळमजल्यावर आणि वरच्या तीन मजल्यांपर्यंत पोहोचली होती. सुमारे ८,००० ते १०,००० चौरस फूट क्षेत्र या आगीत जळाले. मॉलला काचेची तावदाने होती व काचेचे बनवलेली घुमटाकृती छत होते. त्यामुळे आग, धूर, उष्णता बाहेर जाऊ शकली नाही. या आगीत अनेक दुकाने, कपडे, सौंदर्यप्रसाधने आणि इतर मालमत्ता भस्मसात झाली. मॉलच्या बंद छतामुळे आणि काचेच्या बाहेरील भिंतींमुळे धूर आणि उष्णता बाहेर जाऊ शकली नाही, त्यामुळे आग वेगाने पसरली असे आढळून आले.
आगीत मॉलमधील व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काही दुकानदार बुधवारी मॉलजवळ आले होते. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या मॉलचे दृश्य पाहून ते हादरले. अनेकांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मालाचा अधिकचा साठा केला होता. तो संपूर्ण नष्ट झाला आहे. दरम्यान, मॉलला आग लागल्याची कारणे काय होती आणि मॉलमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का याची चौकशी सुरू आहे.
आगीची कारणे काय ? आग का वाढली ?
१) इमारतीच्या तळघरांमध्ये कुठेही वायूविजन व्यवस्था नसल्याने धूर, उष्णता आणि आगीचे प्रमाण वाढले. धूर व उष्णता जिन्याच्या मार्गाने बाहेर पडत असल्याने तळघरात प्रवेश करण्यास अशक्य होत होते.
२) इमारतीतील तीन तळघरापैकी एकाही तळघरात हवा बाहेर पडण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे धूर व उष्णता भरपूर प्रमाणात संपूर्ण मॉलमध्ये वाढत जाऊन इमारतीचे व इमारतीच्या आतील साहित्याचे तापमान झपाट्याने वाढले. हेच कारण आग पसरण्यास कारणीभूत ठरले.
३) इमारतीतील अग्निशमन यंत्रणा चालू नसणे ही बाब आग पसरण्यास कारणीभूत ठरली