मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील दोन पुनर्वसित इमारतीमधील ५५६ घरांचा ताबा केव्हा मिळणार याची प्रतीक्षा रहिवाशांसह सर्वांचा होती. अखेर आता ही प्रतीक्षा संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी वाॅर रुममध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे अखेर शुक्रवारी म्हाडाच्या मुंबई मंडळाला चावी वाटपाच्या सोहळ्यासाठी वेळ दिली आहे. त्यानुसार गुरुवारी माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर येथे चावी वाटपाचा सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चावी वाटप करण्यात येणार आहे.

ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळीचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून केला जात आहे. या तिन्ही ठिकाणी पुनर्वसित इमारतींची पहिल्या टप्प्यातील कामे सुरू आहेत. त्यानुसार वरळीतील पहिल्या टप्प्यात ३००० हून अधिक घरे बांधण्यात येत आहेत. १३ पुनर्वसित इमारतींमध्येही ३००० हून अधिक घरे आहेत. मुंबई मंडळाने १३ पैकी दोन पुनर्वसित इमारतींचे बांधकाम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण केले आहे. केवळ वीज, पाणीपुरवठा आणि निवासी दाखला मिळण्यास विलंब झाल्याने घरांचा ताबा देण्यासही विलंब होत होता. पण अखेर मुंबई मंडळाने वीज, पाणीपुरवठा सेवा सुरू केली, तर निवासी दाखलाही घेतला. मात्र त्यानंतरही घरांचा ताबा रखडला होता.

घरांचा ताबा देण्याचा, चावी वाटपाचा मोठा सोहळा करण्याचा घाट राज्य सरकारचा, म्हाडाचा होता. त्यामुळे म्हाडाने या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. मात्र ही वेळ मिळत नसल्यानेही ताब्यास विलंब होत होता. त्यामुळे म्हाडा, सरकारवर टीका होत होती, तर वरळीतील रहिवाशांमध्ये नाराजी होती. स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनीही वरळीतील घरांचा ताबा तातडीने देण्याची मागणी केली होती. शेवटी सोमवारी वाॅर रुममध्ये मुख्यमंत्र्यांनी बीडीडीच्या कामाचा आढावा घेतला आणि पुढील आठवड्यात चावी वाटपासाठी वेळ दिली जाईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानुसार शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयाने १४ ऑगस्टची वेळ दिल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.

मांटुग्यातील यशवंत नाट्य मंदिर येथे सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप होणार आहे. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहे. पावसाळा सुरू असल्याने प्रकल्पस्थळाऐवजी यशवंत नाट्य मंदिरात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प्रातिनिधीक स्वरुपात १५ रहिवाशांना चावी वाटप करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. १४ ऑगस्टला वरळीतील इमारत क्रमांक ३०, ३१ आणि ३६ मधील ५५६ रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाणार आहे. त्यामुळे आता या रहिवाशांची हक्काच्या घराची प्रतीक्षा संपणार असून १८० चौ. फुटाच्या घरातून हे रहिवाशी थेट ५०० चौ. फुटाच्या घरात आणि ४० मजली उत्तुंग इमारतीत राहायला जाणार आहेत.