मुंबई : मुंबई शहरातील ‘महालक्ष्मी यात्रा’ यावर्षी सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई उपनगरातून, तसेच भायखळा, महालक्ष्मी रेल्वेस्थानक येथून महालक्ष्मीदरम्यान २५ विशेष बसगाडया सोडण्यात येत आहेत. शहराच्या विविध भागांतून महालक्ष्मी मंदिरमार्गे वळविण्यात येणाऱ्या बसमार्गावरील बसफेऱ्यांमध्येही आवश्यकतेप्रमाणे वाढ करण्यात येईल.
महालक्ष्मी मंदिराला भेट देणारे प्रवासी मोठ्याप्रमाणावर भायखळा स्थानक व महालक्ष्मी स्थानक येथे लोकलने येऊन तेथून बेस्टच्या बसचा लाभ घेतात. त्यामुळे या मार्गावर बेस्ट उपक्रमाच्या जास्तीत जास्त गाड्या भायखळा, महालक्ष्मी स्थानक ते महालक्ष्मी मंदिर या दरम्यान चालवण्यात येतील. भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची बस स्थानकावर नियुक्ती करण्यात आली आहे.
महालक्ष्मी बेस्ट बसमार्ग ए-३७, ५७, १५१, ए-६३, ए-७७, ए-७७ जादा, ए-३५७, ८३, ए-१३२ या बसमार्गावर दररोज २५ अतिरिक्त गाडया चालवण्यात येतील. या व्यतिरिक्त लोकल प्रवाशांसाठी प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) येथून महालक्ष्मी मंदिरात जाण्याकरीता गर्दीच्या वेळी लालबाग, चिंचपोकळी, सातरस्ता व महालक्ष्मी रेल्वे स्थानकमार्गे नवरात्रीच्या ९ दिवसाच्या कालावधीत विशेष बससेवा चालवण्यात येतील. महालक्ष्मी यात्रेदरम्यान बेस्ट उपक्रमातर्फे उपलब्ध असलेल्या विशेष बससेवेचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. यात्रेनिमित्त जादा बस चालवण्यात येणार असल्याने इतर बस आगारांमधून बसनिरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
या मार्गावर धावणार अतिरिक्त बस
– जे. मेहता मार्ग ते कुर्ला स्थानक (प) या दरम्यान धावणारी बेस्ट बसमार्ग क्रमांक ए-३७ बस
– वाळकेश्वर ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) दरम्यान धावणारी बेस्ट बसमार्ग क्रमांक ५७ बस
– भायखळा स्थानक (प) ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय दरम्यान धावणारी बेस्ट बसमार्ग क्रमांक ए-६३ बस
– भायखळा स्थानक (प) ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय दरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-७७ बस
– संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय दरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-७७ जादा बस
– कुलाबा बसस्थानक ते सांताक्रूझ आगारादरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ८३ बस
– वडाळा आगार ते ब्रीचकॅन्डी रुग्णालयादरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक १५१ बस
– मुंबई सेंट्रल आगार ते इलेक्ट्रीक हाऊस दरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-१३२ बस
– मुंबई सेंट्रल आगार ते शिवाजीनगर आगारादरम्यान धावणारी बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-३५७ बस