मुंबई : बेस्टमधील कामगारांच्या पतपेढीच्या निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या अपयशाचीच चर्चा सुरू असतानाच भाजपमधील अंतर्गत वादही उघडकीस आला आहेत. आमदार प्रसाद लाड यांना कमी जागा आणि शशांक राव यांचा दणदणीत विजय या निकालाला भाजपमधील अंतर्गत वादच कारणीभूत ठरला आहे.

ठाकरे बंधूवर आरोप करणाऱ्या लाड यांनाही घवघवीत यश मिळवता आले नाही. कामगारांनी कामगार सेनेला नाकारले असले तरी लाड यांनाही दूर ठेवले आहे. बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालांचे राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटले आहेत. शिवसेना (ठाकरे) प्रणित बेस्ट कामगार सेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांनी एकत्र येऊन या निवडणुकीत पॅनेल उतरवल्यामुळे या निवडणूकीला वेगळेच वलय प्राप्त झाले होते. त्यांना आव्हान देण्यासाठी प्रसाद लाड यांनीही एक पॅनल उभे केले होते. गेली नऊ वर्षे बेस्टच्या पतपेढीवर सत्ता असलेल्या बेस्ट कामगार सेनेला एकही जागा जिंकता न आल्यामुळे ठाकरे बंधूंच्या ब्रॅंड चालला नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला आव्हान देण्यासाठी प्रसाद लाड सर्व शक्तीनिशी उतरले होते. ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे माजी आमदार किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना अशा पाच संघटनांनी एकत्र येऊन सहकार समृध्दी पॅनलची निर्मिती केली होती. पण कामगारांनी ठाकरे ब्रॅण्डबरोबरच लाड यांनाही नाकारले.

या निवडणुकीत ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनेलचा एकही उमेदवार जिंकून आला नाही. पण प्रसाद लाड यांच्या पॅनेलला मिळालेल्या सात जागापैकी दोन उमेदवार किरण पावसकर यांच्या संघटनेचे आहेत. तर एक उमेदवार हा एससी एसटी कामगार संघटनेचा आहे. त्यामुळे लाड यांचे केवळ चार उमेदवार जिंकले आहेत. सर्वच्या सर्व २१ उमेदवार जिंकून आणण्याची तयारी लाड यांनी केली होती. प्रत्यक्षात चारच उमेदवार जिंकून आल्यामुळे त्यांनाही मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे. निकालानंतर लाड यांनी जी प्रतिक्रिया दिली होती त्यात ते म्हणाले होते की, ही माझी कामगार क्षेत्रातील पहिली स्वतंत्र निवडणूक असून, पक्षीय पाठिंबा नसताना लढून आम्ही ७ जागा जिंकल्या. पक्षाचा पाठिंबा घेतला असता तर आम्ही सर्व जागा जिंकल्या असत्या, याची मला खात्री आहे. त्यामुळे आपल्याला पक्षाचा पाठिंबा मिळाला नाही हे त्यांनीच मान्य केले आहे.

अंतर्गत वाद काय ?

बेस्टमध्ये गेल्या किमान नऊ वर्षांपासून भाजपा बेस्ट कामगार संघ ही संघटना कार्यरत आहे. या संघटनेने आपले पॅनेल या निवडणुकीसाठी तयार केले होते. ठाकरे यांच्या पॅनेलला हरवण्यासाठी काही संघटना एकत्र येऊन एका ताकदीचे पॅनेल उभे करण्यासाठी या संघटनेने पुढाकार घेतला होता. मात्र भाजप बेस्ट कामगार संघाने आपले अर्ज मागे घेतल्यानंतर लाड यांच्या पॅनेलची घोषणा झाली. मात्र लाड यांच्या पॅनेलमध्ये भाजप कामगार संघाला बाजूला ठेवून पॅनेल तयार करण्यात आले. त्यामुळ भाजप बेस्ट कामगार संघाकडे पॅनेल तयार करावे एवढे उमेदवार नव्हते. याचाच राग भाजपच्या संघटनेतील कामगारांनी काढल्याचीही चर्चा आहे. या कामगार संघटनेचे सुमारे दोन ते तीन हजार सभासद आहेत. या सभासदांनी दोन्ही पॅनेलला नाकारत थेट शशांक राव यांना पाठिंबा दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

शशांक राव यांनी मानले भाजपचे आभार

या निवडणुकीत शशांक राव यांना भरघोस यश मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. राव यांची बेस्ट कामगार युनियन ही बेस्टमधील मान्यताप्राप्त संघटना आहे. त्यामुळे त्यांच्या युनियनचे कामगारांमध्ये अधिक वजन आहे. तसेच राव यांनी आतापर्यंत कामगारांच्या प्रश्नासाठी अनेकदा आंदोलनेही केली आहेत. त्यामुळे त्यांच्या यशाक या गोष्टी आहेतच, पण भाजपच्या संघटनेचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे. निकालात मिळालेल्या यशाबद्दल बोलताना राव यांनी हे मान्य केले आहे. शशांक राव यांनी गेल्यावर्षीच भाजपात प्रवेश केला असून ते भाजपचेच म्हणून ओळखले जातात. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, मी भाजपात असलो, भाजपाचे विचार मनात असले तरी आम्ही प्रामुख्याने कामगारांसाठी काम करतो आणि पक्षांकडून जी काही मदत मिळते ती घेतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांना नेहमीच मदत केली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हा देखील आम्हाला मदत करीत होते. आम्हाला भाजपा नेते आशिष शेलार यांनी देखील मदत केली. कामगारांना ग्रॅच्युइटी मिळत नव्हती तेव्हा शेलार यांनी कामगारांची मदत केली. त्याच कामाची निवडणुकीतून पोचपावती मिळाली आहे.”