मुंबई : मध्य रेल्वेवरील बदलापूर-अंबरनाथ दरम्यान मालगाडीचे चाक घसरल्याने, लोकल सेवा ठप्प झाली आहे. ही घटना सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. या घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. तर, कल्याणवरून कर्जत-खोपोली दिशेने जाणारी लोकल सेवा कुर्मगतीने धावत आहे.

रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून, सोमवारी सकाळी पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. याचा फटका लोकल सेवेला बसला. डहाणू रोड, विरार, बोरिवलीवरून चर्चगेटच्या दिशेने आणि कर्जत, खोपोली, अंबरनाथ, बदलापूर, कसारा, आसनगाव, टिटवाळा, कल्याण, ठाणे, पनवेल, नेरुळ वाशीवरून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला. त्यात बदलापूर-अंबरनाथ दरम्यान मालगाडीचे चाक रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली. सकाळपासून विलंबाने धावणाऱ्या लोकल, लांब पल्लाच्या रेल्वेगाड्या या चाक घसरण्याच्या दुर्घटनेमुळे पूर्णपणे बंद झाल्या.

मध्य रेल्वेचे म्हणणे काय…

रिमझिम पाऊस आणि चाक घसरल्यामुळे एक मालगाडी अप दिशेने थांबली आहे. सहाय्यक इंजिन पाठवण्यात आले आहे आणि ही मालगाडी हलवण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

प्रवासी हैराण

कर्जतवरून सीएसएमटीकडे येणारी लोकलसेवा बंद झाल्याने, प्रवाशांचा प्रवास रखडला आहे. तसेच वांगणी, भिवपुरी, कर्जत या दरम्यान लोकल एका मागे एक थांबल्या आहेत. लोकल बराचवेळ मार्गस्थ होत नसल्याने प्रवासी हैराण झाले.

कसारा आणि कर्जतवरून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्याचे वेळापत्रक कोलमडले. तसेच या मार्गावरील धीम्या लोकलला अर्धजलद किंवा जलद करून सीएसएमटीच्या दिशेने चालवण्यात आल्या. ऐनवेळी लोकल वेळापत्रकात बदल केल्याने, धीम्या मार्गावरील प्रवाशांना लोकलसाठी वाट पाहावी लागली.