मुंबई : सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात जाऊन दागिने चोरणाऱ्या दोन वृद्ध महिलांना भांडुप पोलिसांनी अटक केली. या दोन्ही महिला सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात सहा ते सात गुन्हे दाखल असल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली.भांडुपच्या कोकण नगर परिसरात मनोज जैन यांचे ‘लव्ह गोल्ड’ नावाचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे.

या दुकानात दीड महिन्यांपूर्वी दोन महिला दागिने खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. या महिलांसोबत दोन लहान मुलेही होती. यावेळी महिलांनी सराफाला बोलण्यात गुंतवून दुकानातील एक लाख २७ हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केला. काही वेळानंतर ही बाब सराफाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भांडुप पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे या महिलांची ओळख पटवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही महिला मुळच्या जालना जिल्ह्यातील असून गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कल्याण परिसरात राहत असल्याची माहिती भांडुप पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून कल्याणच्या नेवाळी नाका परिसरातून या दोन्ही महिलांना अटक केली. उषाबाई मकाळे (६०) आणि लिलाबाई ढोकले (६२) अशी त्यांची नावे असून त्यांच्याविरोधात मुंबईसह कल्याण, ठाणे आणि संभाजी नगर येथे सहा ते सात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.