शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईत भाजपा आणि शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाकडून होणाऱ्या “आमचं सरकार आल्याने हिंदूंच्या सणांवरील संकट टळलं” या बॅनरबाजीला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. “सातत्याने गोबेल्स नीती वापरण्याचं काम काही पक्ष करत आहेत,” असं म्हणत भास्कर जाधवांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. तसेच महाविकासआघाडी सरकारच्या काळात आपण शिमगा, गुढीपाडवा शोभायात्रा आणि ईदही धुमधडाक्यात साजरी केल्याचं म्हटलं. ते बुधवारी (२१ सप्टेंबर) मुंबईतील नेस्को सभागृहात आयोजित गटप्रमुखांचा मेळाव्यात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भास्कर जाधव म्हणाले, “आमचं सरकार आलं आणि हिंदूंच्या सणांवरील संकट टळलं असे मुंबईत फार मोठे बॅनर लागले आहेत. परंतु, सातत्याने गोबेल्स नीती वापरण्याचं काम काही पक्ष करत आहेत. मात्र, आपण लक्षात ठेवलं पाहिजे की, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकासआघाडीने मोठं काम केलं.”

“मविआ सरकारच्या काळात गुढीपाडव्यापासून ईदपर्यंत सण धुमधडाक्यात साजरे”

“आपण केवळ कालची दहीहंडी आणि गणेशोत्सव मनमोकळेपणाने साजरा केला नाही, तर यंदाचा शिमगा, गुढीपाडवा शोभायात्रा आणि ईदही आपण धुमधडाक्यात साजरी केली. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वापासून ही सुरुवात झाली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे,” असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं.

“दंगल झाल्यावर मराठी माणूस घरी बसला असता तर काय झालं असतं?”

भास्कर जाधव पुढे म्हणाले, “१९९२-९३ ची दंगली झाली. त्याचा उल्लेख सगळे करतात. मात्र, मला सगळ्याच जाती-धर्माच्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा दंगल झाली तेव्हा शिवसेनेने मुंबई वाचवली. शिवसेना म्हणजे मराठी माणूस. मराठी माणसाची ओळख नोकरी करणारा अशी होती. तेव्हा त्याच व्यापार नव्हता, दुकानं नव्हती, हॉटेल नव्हते, कापड दुकान नव्हतं. अशावेळी दंगल झाल्यावर मराठी माणूस घरी बसला असता तर काय झालं असतं?”

हेही वाचा : “याचा मेंदू सडलाय आणि डोकं…” एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर हल्लाबोल!

“मराठी माणसाने दंगल झाली तेव्हा व्यापार कुणाचा होता हे पाहिलं नाही”

“मराठी माणसाने दंगल झाली तेव्हा व्यापार कुणाचा होता हे पाहिलं नाही. श्रीकृष्ण अहवाल काढून बघा. त्यात सगळ्यात जास्त त्रास शिवसैनिकांना झाला आहे. त्यावेळी मराठी माणूस म्हणून शिवसैनिकाने असा विचार केला नाही की माझी दुकानं नाही, माझा व्यापार नाही, माझी नोकरी आहे, म्हणून मी शांतपणे घरी बसेन. मुंबईत राहणारा प्रत्येक जाती-धर्माचा माणूस आमचा आहे असं शिवसैनिकाने म्हटलं. त्यामुळे या निवडणुकीत सर्व जाती-धर्माच्या लोकांकडे जा आणि त्यांना हे सांगा,” असंही भास्कर जाधवांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav criticize shinde fadnavis government over banners in mumbai pbs
First published on: 21-09-2022 at 20:44 IST