मुंबई : येत्या महापालिका निवडणूकीत महायुतीमध्ये कशाप्रकारे जागा वाटप होणार याकडे सध्या सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. गेल्या पंचवीस तीस वर्षात एकसंघ शिवसेनेने भाजपला कधीच जास्त जागा दिल्या नव्हत्या. मात्र तरीही भाजपच्या नगरसेवकांची संख्या मुंबई महापालिकेत सतत वाढत असून यावेळी जास्तीत जास्त जागा लढवून सर्वात मोठा विजय मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. महायुतीमधला मोठा भाऊ म्हणून जागा वाटपात जास्तीत जास्त जागा आपल्याकडे घेण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.
दिवाळी संपल्यानंतर आता सगळ्यांना मुंबई महापालिका निवडणूकीचे वेध लागले आहेत. आरक्षण, मतदार याद्या या प्रशासकीय तयारीच्या बरोबरीने राजकीय पक्षांमध्ये जागावाटपावरून खल सुरू होऊ लागले आहेत. त्यातच भाजपने या निवडणूकीत १५० जागा लढवण्याचा आग्रह धरला आहे. तर शिवसेना (शिंदे) पक्षासाठी ६० ते ७५ जागा दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र समसमान जागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आग्रह आहे. मात्र एकसंघ शिवसेनेने भाजपला कधीच ६० ते ७० जागांपेक्षा अधिक जागा लढू न दिल्याची सल भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या मनात आहे.
तर गेल्यावेळी म्हणजेच २०१७ च्या निवडणूकीत भाजपने स्वबळावर २०० जागा लढवून ८२ जागा जिंकल्या होत्या. मात्र तरीही महापौर पदाचा आग्रह न धरता पहारेकरी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत भाजप कुठल्याही परिस्थितीत जागा वाटपात कमीपणा घेणार नाही अशी चर्चा आहे.
मुंबई महापालिकेवर गेली ३० वर्षे शिवसेना (ठाकरे) पक्षाची सत्ता होती. त्यापैकी २५ वर्षे शिवसेना भाजपची सत्ता होती. त्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जेव्हा भाजपचे लोकप्रतिनिधी आरोप करतात. तेव्हा तुम्हीही सत्तेत होतात असा प्रतिप्रश्न केला जातो. परंतु, भाजपला कधीच ६० ते ७० जागांपेक्षा जास्त जागा लढायला मिळाल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी प्रसार माध्यमांशी झालेल्या एका संवादा दरम्यान दिली होती. यावेळीही जागा वाटप करताना जास्तीत जास्त जागा जिंकून येण्याच्या दृष्टीने उमेदवारांची निवड केली जाईल. ‘सिटिंग उमेदवार’ किंवा माजी नगरसेवक हा मुद्दा तितका महत्त्वाचा नसेल तर कोणाला त्या प्रभागातील समस्यांची जाण आहे, कोण ही जागा जिंकू शकतो, याचाच अधिक विचार केला जाणार असल्याचेही साटम यांनी त्यावेळी म्हटले होते.
मुंबई महापालिकेत भाजपचे नगरसेवक हे २०१२ पर्यंत केवळ ३० च्या आसपास होते. भाजपला जेमतेम ६० ते ७० जागा लढायला मिळत. त्यापैकीही २०१२ मध्ये ८ जागा आरपीआयला दिल्या होत्या. त्यामुळे भाजपला गेल्या ३० वर्षात मुंबई महापालिकेत फारशी संधी मिळाली नाही. या सगळ्याचा वचपा भाजप आता शिंदे यांच्या पक्षासोबत काढणार की समान जागा वाटप करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेत भाजपच्या अशा वाढल्या जागा
- १९९२ – १४
- १९९७ – २६
- २००२ – ३५
- २००७ – २९
- २०१२ – ३१
- २०१७ – ८२
भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे की, भाजप हा विधानसभेत मोठा भाऊच आहे. मुंबई महापालिकेतही भाजप मोठा भाऊच असेल. जुन्या शिवसेनेची शकले पडल्यामुळे भाजप हा आता मोठा भाऊच आहे, असेही ते म्हणाले.
