वयासोबत परिपक्वता वाढावी असा टोला लगावत भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना वाढदिवसानिमित्त खोचक शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच ठाकरे आणि मोदींमध्ये विसंवाद निर्माण करण्यासाठी संजय राऊतच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. मंदिराची शपथ घेऊन असत्य पसरवणं मान्य नाही अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. शिवसेनेचा मोदींबद्दलचा आदर स्वाथी की नि:स्वार्थी असा सवाल यावेळी त्यांनी विचारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशिष शेलार यांनी अमित शाह यांच्या मुलाखतीचा उल्लेख करत, त्यांनी मांडलेली भूमिका सत्य असल्याचं सांगितलं. “अमित शाह यांनी कोणाला खोटं पाडण्यासाठी नाही तर सत्य समोर आणण्याचं काम केलं आहे. अमित शाह यांनी मांडलेली भूमिका सत्य आहे. सत्य सांगितल्यावर काहींची अडचण होत असेल तर आम्ही काही करु शकत नाही. राजकीय स्वार्थापपोटी असत्य पसरवणं अमान्य आहे,” असं आशिष शेलार यांनी यावेळी म्हटलं.

संजय राऊत यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. मोदींचे बाळासाहेबांबरोबर खास नातं होतं. हे नातं ते पंतप्रधान होण्याआधीपासूनचं होतं. आता कोणीतरी मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू पाहत आहे असा आरोप राऊत यांनी केला होता. यावर बोलताना आशिष शेलार यांनी विसंवाद निर्माण करण्याचं काम कोण करतं हे संपूर्ण महाराष्ट्र रोज सकाळी दूरचित्रवाणीवरुन पाहतो अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली.

“तिन्ही पक्षांचं सुरु असलेलं नाटक महाराष्ट्राला अमान्य आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये एकमेकांना भेटण्यासाठी ओढ लागली आहे. मातोश्रीऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका सुरु आहेत,” असं आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं. “मातोश्रीचा सन्मान ठेवून भाजपा नेते मातोश्रीवर राजकीय चर्चा करण्यासाठी जात असायचे. पण आता सत्तेच्या लालसेपोटी मातोश्री सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटायला जात आहेत. मातोश्रीवरुन कोणी राज ठाकरेंनाही भेटायला जात नव्हतं. पण आता मातोश्री सोडून माणिकराव ठाकरे यांना भेटायला जात आहेत,” असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ashish shelar amit shah narendra modi shivsena sanjay raut uddhav thackeray maharashtra political crisis sgy
First published on: 15-11-2019 at 11:37 IST