MNS Sandeep Deshpande Induri Chaat in Dadar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईसह महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगार, मराठी भाषेचा मुद्दा, नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य असे मुद्दे सातत्याने आवाज उठवताना दिसतात. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी याच मुद्द्यावरून सतत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यात आघाडीवर असल्याचं पाहायला मिळथं. परंतु, भाजपाने आता संदीप देशपांडे यांच्या उपहारगृहातील पदार्थ आणि तिथे काम करणारे आचारी व कर्मचारी परप्रांतीय असल्याचा दावा करत देशपांडेंना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. या ट्रोलिंगला देशपांडे व मनसेने जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

संदीप देशपांडे यांनी नुकतंच दादरमध्ये ‘इंदुरी चाट आणि बरंच काही…’ या नावाने एक उपहारगृह सुरू केलं आहे. या उपहारगृहात महाराष्ट्रीय व इंदूर शहरातील पारंपरिक खाद्यपदार्थ विकले जातात. संदीप देशपांडे यांनी या उपहारगृहाचा व्हिडीओ देखील शेअर केला होता. सुप्रसिद्ध शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंह यांनी त्यांच्या उपहारगृहाला भेट दिली होती, तो प्रसंग कॅमेऱ्यात कैद करून देशपांडे यांनी त्याचा व्हिडीओ शेअर केला होता.

भाजपाची टीका

दरम्यान, भाजपाशी संबंधित ‘भाजपा येणार मुंबई घडवणार’ या फेसबूक पेजवरून या उपहारगृहाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यासह भाजपा समर्थकांनी म्हटलं आहे की “या हॉटेलचा कूक (आचारी) परप्रांतीय, या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय , प्रमोशन करत आहेत ते पण परप्रांतीय, नाव देवनागरी लिपीत लिहिलं आहे. यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही ते मराठी महापौर करण्याच्या गप्पा मारत आहेत. महापौर मराठीच होणार पण महायुतीच्या हिंदुत्ववादी विचारांचा…”

संदीप देशपांडे यांचं जशास तसं प्रत्युत्तर

भाजपाच्या या टीकेला संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “भाजपाला महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही. बौद्धिक दिवाळखोरांच्या पक्षाकडून काय अपेक्षा करणार?”

“ट्रोल करणाऱ्यांचे दावे पाहून त्यांची बौद्धिक दिवळखोरी दिसून आली. मुळात गंमत अशी आहे की या लोकांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही. इंदूर (सध्याचं नाव इंदोर) शहराचा जो काही विकास झाला, हे शहर नावारुपाला आलं ते केवळ राजे होळकरांमुळे. मराठ्यांनी ते शहर वसवलं, उभं केलं त्याचा विकास केला. त्यामुळे आम्ही परप्रांतीय पदार्थ विकतोय असं म्हणणं ही भाजपाची बौद्धिक दिवाळखोरी म्हणावी लागेल. मला वाटतं की जनता त्याचा निर्णय घेईल. या लोकांना इडली-सांभार विकायला अडचण नाही, परंतु आम्ही इंदूरी पदार्ध विकले तर अडचण आहे? हे काय इंदूरविरोधात आहेत का? हे भाजपावाले होळकरांच्या विरोधात असावेत, भाजपाचा मराठ्यांना विरोध आहे ते दिसतंय.”

देशपांडे म्हणाले, “भाजपावाल्यांचा मराठ्यांना आणि मराठी भाषेला विरोध आहे देत नेहमीच पाहायला मिळतं.”