मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तंत्रज्ञानाच्या पद्धतीने लोकशाहीवर पद्धतशीर हल्ला केला. मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपला सोयीचे बदल करण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आले आहे. त्या निवेदनाचा हवाला देत आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर आयोगावर पुन्हा आरोप केले आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जे घडले, ते केवळ निवडणुकीतील गैरप्रकार नव्हते, तर लोकशाही व्यवस्थेवर तंत्रज्ञानाच्या मदतीने पद्धतशीरपणे चढवलेला हल्ला होता. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी, मतदान सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला औपचारिकपणे भाजप अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये फेरफार करत असल्याबद्दल सतर्क केले होते. आम्ही निवडणुकीनंतर नव्हे तर निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगाला तक्रार वजा पूर्वसूचना दिली होती, असे आव्हाड म्हणाले.
आव्हाड पुढे म्हणाले, आमच्या तक्रारीत भाजपचे कार्यकर्ते भाजप विरोधी मतदारांची ओळख पटवून त्यांची नावे हटण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करीत होते. बनावट आधारकार्ड आणि फेरफार केलेल्या माहितीचा (डेटा) वापर करून भाजप समर्थक बनावट मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जात होती, याची तपशीलवार माहिती आम्ही निवडणूक आयोगाला दिली होती. विरोधी मतदारांना लाल रंगाने चिन्हांकित केले गेले होते, तर भाजप समर्थकांना हिरव्या रंगाने चिन्हांकित केले गेले होते. निवडणूक आयोगाच्या या याद्या खासगी सर्व्हरवर किंवा खासगी यंत्रणेवर अपलोड केल्या गेल्या होत्या. सायबर कॅफे किंवा सेतू कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघात किमान दहा हजार बनावट भाजप समर्थकांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. विशेष म्हणजे तुळजापूरमध्ये बनावट मतदार नोंदणींचा प्रकार उघडकीस आल्यानंतर १७ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने धाराशिवमध्ये एफआयआर दाखल केला.
आम्ही शिर्डी, चंद्रपूर, कोथरूड, नागपूर, गोंदिया आदी १३ मतदार संघांमध्ये मतदार यादीमध्ये कशा पद्धतीने बनावट मतदारांची नावे घुसविण्यात आली आणि महाविकास आघाडी समर्थकांची नावे काढून टाकण्यात आली, याचे ठोस पुरावे सादर दिले होते. तरीही, निवडणूक आयोगाने मौन बाळगले. या सर्व प्रकाराकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केले. पण आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही भाजपला आमचे संविधान आणि लोकशाही चिरडून टाकू देणार नाही. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढू, आम्ही हार मारणार नाही. कोणत्याही परिस्थितीत भारतीय संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी असलेल्या संस्थांना वाचवू त्यांची मोडतोड करू देणार नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.