‘मातोश्री’वरून शिवसैनिकांना मैत्री जपण्याचे आदेश
प्रसाद रावकर, मुंबई</strong>
देशभरात भाजपने सुरू केलेल्या ‘मेरा परिवार – भाजप परिवार’, ‘कमल ज्योती संकल्प’ या मोहिमांमुळे मुंबईत शिवसेनेत मात्र अस्वस्थता पसरली आहे. भाजपकडून गल्लोगल्ली पक्षविस्तारासाठी प्रयत्न सुरू झाल्याने नाराज झालेल्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’ येथे जाऊन शिवसेना पक्षनेतृत्वाकडे तक्रारही केली. परंतु, ‘आता युती झाली आहे. आपण चांगला मित्र असल्याचे दाखवून देऊ’ असा संदेश देऊन या शिवसैनिकांना पिटाळण्यात आल्याचे समजते.
गेली साडेचार वर्षे सत्तेत एकत्र राहूनही एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत युती करण्याची घोषणा केली आहे. पक्षनेतृत्वात दिलजमाई झाली असली तरी, स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अजूनही राजकीय हेवेदावे कायम आहेत. त्यातच भाजपने मुंबईसह देशभरात सुरू केलेल्या पक्षविस्तार आणि प्रसाराच्या मोहिमेमुळे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
भाजपने मुंबईमध्ये ‘मेरा परिवार – भाजप परिवार’ आणि ‘कमल ज्योती संकल्प’ अशी दोन अभियाने सुरू केली आहेत. ‘मेरा परिवार – भाजप परिवार’ अभियानात मुंबईमधील भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घराबाहेर दर्शनी भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले स्टिकर्स चिकटविण्यात येत आहेत. ‘फिर एक बार मोदी सरकार’, ‘मेरा परिवार – भाजप परिवार’ असे संदेश या स्टिकर्सवर नमूद करण्यात आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या घराबाहेर पक्षाचा झेंडाही फडकविण्यात येत आहे व कमळाची मोठी रांगोळी काढण्यात येत आहेत. भाजपच्या या अभियानामुळे शिवसैनिकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
या अभियानाच्या माध्यमातून भाजप स्वबळ वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार करत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेतली. मात्र ‘आपण चांगला मित्र असल्याचे दाखवून देऊ’, असे आदेश ‘मातोश्री’ने शिवसैनिकांना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. शिवसेनेने अचानक भाजपविरोधात तलवार म्यान केल्यामुळे स्थानिक पातळीवर कोणती भूमिका घ्यायची, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या शिवसैनिकांच्याही पोटात गोळा आला आहे. युती टिकली नाही, तर भाजपच्या या अभियानामुळे आपला टिकाव लागणे अवघड होईल, अशी भीती इच्छुकांना ग्रासू लागली आहे.