“राज्याचं एटीएस काय झोपलं होतं का?” मुंबई दहशतवादी अटक प्रकरणी भाजपाचा संतप्त सवाल!

मुंबईत जान मोहम्मद शेख नावाच्या दहशतवाद्याला अटक केल्यानंतर भाजपाकडून त्यावर कठोर शब्दांत टीका करण्यात आली आहे.

ashish shelar on terrorist arrest in mumbai
आशिष शेलार यांची राज्य सरकारवर टीका

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत येऊन जान मोहम्मद शेख याला अटक केल्यानंतर या मुद्द्यावरून वातावरण तापू लागलं आहे. एकीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली असताना दुसरीकडे आता भाजपाकडून या प्रकरणी तीव्र टीका केली जाऊ लागली आहे. “हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का? या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातले पोलीस काय करत होते?” असा सवाल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केला आहे. यासंदर्भात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“दाऊदचा भाऊ यांना पैसा पुरवत होता”

या दहशतवाद्यांचं प्रशिक्षण पाकिस्तानात झालं असून दाऊदचा भाऊ अनिस अहमद त्यांना पैसा पुरवत होता, असं आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं. “नवरात्र, रामलीला आणि उत्सव काळात घातपात घडवणाऱ्या आणि त्याचा कट करणाऱ्या दहशतवाद्यांना दिल्लीच्या विशेष पथकाने अटक केली. त्यापैकी जान मोहम्मद शेख आणि समीर या दोघांना महाराष्ट्रातून अटक केली. त्यातल्या एकाला तर धारावीत अटक केली. हिंदूंच्या सणांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट करणाऱ्या या दहशतवाद्यांना दाऊदचा छोटा भाऊन अनिस अहमद पैसा पुरवत होता. यांचं प्रशिक्षण पाकिस्तानमध्ये झालं”, असं ते म्हणाले.

“विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असं तर नाही?”

दरम्यान, आशिष शेलार यांनी विशिष्ट वर्गासाठी राज्य सरकार मवाळ भूमिका तर घेत नाही ना? अशी गंभीर शंका उपस्थित केली आहे. ” मुंबईत, धारावीत अशा दहशतवाद्यांचा निवास, कटकारस्थान सुरू होतं. दिल्लीहून येऊन विशेष पथकानं त्यांना अटक केली. मग राज्यातलं एटीएस काय झोपलं होतं का? अदखलपात्र गुन्ह्यात केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे, पत्रकारांना हात नाही पाय लावू असं म्हणणारे किंवा राज्यातल्या विद्यमान आमदाराविरोधात लुकआऊट नोटीस काढणारे आमचे पोलीस या दहशतवाद्यांच्या बाबतीत काय करत होते. याची माहिती राज्याच्या पोलिसांना, गृहमंत्र्यांना होती का? होती तर त्यावर त्यांनी काय भूमिका घेतली? की मग विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असं राजकीय प्रकरण तर नाही ना?”, अशी शंका आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईतल्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी येऊन केली अटक; गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

“नको त्या कामात पोलिसांना गुंतवलं”

“जेव्हा पोलिसांचं लक्ष राज्यकर्ते नको त्या विषयात घालायला लावतात, तेव्हा गंभीर विषयांकडे पोलिसांचं दुर्लक्ष होतं हे आपल्याला दिसतंय. कुठे संपादकाला अटक कर, कुठल्या आमदारावर लुकआऊट नोटीस काढ, केंद्रीय मंत्र्याला अटक कर यामध्ये राजकीय दबावामुळे पोलिसांना लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे गंभीर विषयांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. आमचं पोलीस खातं क्षमतावान आहे. त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. पण सौदेबाजी, वसुलीबाजी करताना आमच्या पोलिसांच्या डोक्यावर मिऱ्या वाटाव्यात असं राज्य सरकार वागतं, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते”, असं देखील आशिष शेलार म्हणाले.

इंटेलिजन्स फेल्युअर…

दरम्यान, यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. “या गंभीर विषयावर एका अर्थाने राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या इंटेलिजन्स फेल्युअरवर आणि इतर मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करावी. अजून अशी काही लोकं राज्यात लपली आहेत का? याबाबतीतली चौकशी वाढवावी”, असं ते म्हणाले.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानने फंडिंग केलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता. यासाठी, मॉड्यूलच्या वेगवेगळ्या संशयितांना आणि त्यांच्या नेटवर्कशी संबंधित लोकांना वेगवेगळी कामे देखील दिली गेली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp mla ashish shelar slams uddhav thackeray government on jaan mohammad shaikh arrest in mumbai pmw