मुंबई : भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची आगामी लोकसभा निवडणूक तयारीसाठी गुरुवारी भिवंडी येथे बैठक व प्रशिक्षण वर्ग होणार आहे. भाजपचे राज्य प्रभारी सी.टी. रवी, सहसरचिटणीस शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपने महाजनसंपर्क अभियान राज्यात राबविले. निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने ही बैठक आणि प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे केंद्रीय पदाधिकारी, राज्यातील सर्व आमदार-खासदार, लोकसभा व विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूकप्रमुख, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, प्रदेश सुकाणू समिती सदस्य आदी पदाधिकारी या प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहणार आहेत.