scorecardresearch

मैदानाच्या नामकरणावरून वादंग ; टिपू सुलतान यांच्या नावाला भाजपचा विरोध

मुंबईमधील दोन रस्त्यांना टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मालाडच्या मालवणी परिसरातील मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून वाद उफाळून आला असून गेले दोन दिवस या प्रकरणाने वातावरण तापू लागले आहे. भाजपने शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. मुंबई अस्थिर करण्याचा घाट घालण्यासाठी टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करण्यात येत असल्याचा आरोप करीत महापौरांनी भाजपवर पलटवार केला.

मुंबईमधील दोन रस्त्यांना यापूर्वीच टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे. विधी समिती, तसेच पालिका सभागृहात भाजपचे नगरसेवक उपस्थित असताना रस्त्यांच्या नामकरणाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी काही प्रस्तावांना मंजुरी देताना भाजप नगरसेवकांनी अनुमोदन दिले होते. भाजपने २०१९ नंतर टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. रस्त्यांच्या नामकरणाच्या प्रस्तावाच्या वेळी भाजप नगरसेवकांनी विरोध का केला नाही, असा प्रश्न उपस्थित करून महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर पलटवार केला. या मैदानाशी पालिकेचा कोणताही संबंध नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

मुंबईमधील दोन रस्त्यांना टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र या संदर्भातील ठरावांवर खाडाखोड करण्यात आल्याचा आरोप पालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौरांचा आरोप खोडून काढताना केला. या दोन्ही रस्त्यांच्या नामकरणाचा फेरविचार करण्यात यावा यासाठी भाजपने पालिका सभागृहात ठराव सादर केला आहे. पालिका सभागृहाच्या पटलावर हे ठराव कधी मांडणार, अशी विचारणा त्यांनी केली. कोणतीही समिती वा सभागृहात नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली नाही. असे असताना या मैदानाचे नामकरण कसे काय करण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मालवणी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल

चारकोप नाका येथील मैदानाच्या नामकरणास विरोध दर्शवत आंदोलन करणाऱ्यांविरोधात मालवणी पोलिसांनी आंदोलकांविरोधात दोन गुन्हे दाखल केले. विश्व हिंदूू परिषद व बजरंग दलाचे चार पदाधिकारी व त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर यांच्यासह नऊ पदाधिकारी व ४८ कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे. बेकायदा जमाव गोळा करणे, करोनाकाळात लागू र्निबधांचे पालन न करणे व इतर कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जबरदस्ती मैदानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तसेच रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण केला, असा त्यांच्यावर आरोप आहे.

मुंबई अस्थिर करू नका

भाजपच्या माजी आमदाराने मुंबईत दंगल होईल असे विधान करून खळबळ माजविली आहे, असा असा दावा महापौरांनी केला. यामागे मुंबईतील कायदा व्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न असून मुंबईतील वातावरण बिघडवण्याचा यामागे घाट घालण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई अस्थिर करू नका, असा इशारा महापौरांनी दिला.

झाशीच्या राणीचे नाव द्या – महापौर

मालवणीमधील मैदानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव द्यावे. तसा प्रस्ताव आल्यास त्याचा प्राधान्यमाने विचार करण्यात येईल, असे स्पष्ट करीत महापौरांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. झाशीच्या राणीचे नाव देण्याची मागणी करीत टिपू सुलतान यांच्या नावाचे महापौर समर्थन करीत असल्याचा आरोप भाजपने केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp strongly oppose tipu sultan name to ground in malad zws

ताज्या बातम्या