मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने रविवारी मुंबईत मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाबरोबर युती असल्याची भाजपला आठवण झाली. इतकेच नव्हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहौपार देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी रिपब्लिकन पक्षाच्या व्यासपीठावरून तशी घोषणा केली.
रामदास आठवले यांनी २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून शिवसेना व भाजपशी हातमिळवणी केली. शिवसेना व भाजपमध्ये फारकत झाल्यानंतर त्यांनी भाजपसोबत राहणे पसंत केले. मात्र अलीकडे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप-शिवसेना शिंदे गट अशी फक्त दोन पक्षांची युती असल्याची भाषा भाजप नेत्यांकडून केली जात होती. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतही भाजप-शिंदे गट युतीची चर्चा सुरू झाली होती.
मात्र आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने रविवारी चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले व त्यामुळे भाजप नेत्यांना रिपाइंबरोबर युती असल्याची आठवण झाली.
