मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक काही महिन्यांवर आली असतानाच सर्वच पक्ष प्रभागनिहाय पक्षबांधणीसाठी तयारीला लागले आहेत. भाजपकडूनही प्रभागात मोर्चेबांधणी सुरू असताना कांदिवली येथील जानुपाड्यात मंत्री आशीष शेलार यांच्यासमोरच भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडले. हाणामारीनंतर आपापसातील तक्रार घेऊन समतानगर पोलीस ठाण्यात दोन्ही गट पोहोचलेही. मात्र पक्षाची पत राखण्यासाठी माघार घेत पक्षपातळीवरच विषय सोडविण्यावर हा वाद तात्पुरता मिटला.
मंत्री आशीष शेलार हे कांदिवलीतील वनजमीन भागातील जानुपाड्यात राहणाऱ्या रहिवाशांच्या समस्यांबाबत भेट घेण्यासाठी पोहोचले होते. ते गाडीतून बाहेर पडल्याबराेबर गाडीसमोरच भाजपमधील दोन गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. हा वाद म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीतील तिकिटासाठीची चढाओढ असल्याचे समजते.
शाब्दिक बाचाबाची
निशा परुळेकर आणि देवांग दवे हे दोघे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. निशा परुळेकर यांना मागील महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळाली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता. आशीष शेलार यांच्या स्वागतासाठी भाजप निवडणूक समितीचे सदस्य असलेले देवांग दवे हे पुढे आले तेव्हा आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर आणि दवे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्याच वेळी दवे आणि दरेकर यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. अखेर यात पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद आवरता घेण्यात आला. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांविरोधात तक्रार करण्यासाठी समतानगर पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र यातून पक्षाचीच बेअब्रू होणार असल्याने वरिष्ठ पातळीवरून तक्रार न करता हा वाद पक्षपातळीवरच सोडविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार या वादावर तात्पुरता पडदा पडला. .