मुंबई : सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध शक्कल लढविल्या जात आहेत. भाजपच्या कोकण विकास आघाडीतर्फे दीप अमावस्या म्हणजेच गटारीनिमित्त शनिवार, १५ जुलै रोजी कोंबडीवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे पोस्टर प्रभादेवी नाक्यावर झळकले आणि समाजमाध्यमावर पसरले. दरम्यान, या फलका वर झळकलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने असा कोणताच कार्यक्रम आयोजित करण्यात आला नसल्याचा खुलासा केला.
प्रभादेवी परिसरात गटारीनिमित्त कोंबडीवाटपाचे आयोजन करण्यात आल्याचे फलक झळकताच रहिवाशांमध्ये चर्चा सुरू झाली होती. फलकावर आयोजक म्हणून भाजपचे पदाधिकारी बबन तोडणकर व चेतन देवळेकर यांचे नाव आहे. तसेच भाजपचे मुंबई सचिव सचिन शिंदे यांचेही छायाचित्रासह नाव झळकत आहे. दरम्यान, भाजपच्या कोकण विकास आघाडीतर्फे असा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही. कोणी तरी खोडसाळपणा करून हे फलक लावले होते. समाजमाध्यमांवर ते मोठय़ा प्रमाणावर पसरवले, असे सचिन शिंदे यांचे म्हणणे आहे. ‘माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी काही खोडसाळ प्रवृत्तींनी कोंबडीवाटपासारख्या एका निंदनीय उपक्रमासाठी माझ्या परवानगीशिवाय माझे छायाचित्र वापरून फलक लावले होते. हे फलक समाजमाध्यमांवर पसरवण्याचा प्रयत्न केला. अशा स्वरूपाचा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यास मी सांगितले नव्हते. या कार्यक्रमास माझा कोणताही पाठिंबा किंवा सहकार्य नव्हते. मी या प्रकाराची चौकशी करीत आहे. ज्यांनी कोणी जाणूनबुजून हा प्रकार केला आहे, त्यांना योग्य त्या कारवाईला सामोरे जावे लागेल. ही माहिती खोटी असून त्या पद्धतीचे संदेश पुढे पाठवणे, त्याला प्रसिद्धी देणे थांबवावे, असे सचिन शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत चर्चा रंगल्यानंतर हे फलक हटविण्यात आले.



