मुंबई : लोकांना लुटणाऱ्या तोतया पोलिसांच्या टोळीतील तिघांना बीकेसी पोलिसांनी नाटयमयरित्या पाठलाग करून अटक केली. या टोळीविरोधात विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
ठाण्यात राहणाऱ्या इरफान पटेल याचा टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याला इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर सोने आयात करणाऱ्या एका व्यक्तीबाबत माहिती मिळाली होती. परदेशातून सोने आयात करून ते भारतात स्वस्त दरात विकण्यात येते असे त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलमध्ये लिहिलेले होते. ते पाहून पटेल याने त्या प्रोफाईलवर असलेल्या रवी नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला. रवी फिर्यादी पटेल याला भेटला. रवी याने आपल्याकडील सोन्याची नाणी, सोने खरेदीची अधिकृत कागदपत्रे दाखवली. त्यावरून पटेल याचा त्याच्यावर विश्वास बसला. पटेलने रवीकडून सोने विकत घेण्याचे ठरवले. ४ लाख रुपयांत ४ तोळे सोने देण्याचा उभयतांमध्ये व्यवहार ठरला.
तोतया पोलिसांचा छापा…
सांताक्रूझ (पूर्व) परिसरातील कलिना येथील सीएसटी रस्त्यावरील बीएमडब्लू कारच्या शो रूम बाहेर २७ मे रोजी सोने खरेदीसाठी भेटण्याचे निश्चित झाले. फिर्यादी पटेल याच्याकडून ४ लाख रुपये घेऊन त्याला ४ तोळ्याचे सोन्याची नाणी दिली जाणार होती. पहिल्या टप्प्यात फिर्यादी त्यांना २ लाख रुपये देणार होता. ठरल्या वेळेप्रमाणे फिर्यादी पटेल नमूद जागेवर जाऊन थांबला. त्यावेळी एक व्यक्ती तिथे आला. रवीने सोने देऊन पैसे घेण्यासाठी पाठवल्याचे त्याने सांगितले. त्याला पटेल याने २ लाख रुपये दिले. इतक्यात एका वाहनातून साध्या वेषातील पोलीस आले आणि त्यांनी छापा टाकला. ते पाहून त्या व्यक्तीने फिर्यादीला पळून जाण्यास सांगितले आणि ते दोघे घटनास्थळावरून पळून गेले. यानंतर पटेलने रवीबरोबर मोबाइलवर संपर्क साधला. पोलिसांचा छापा पडल्याने सोने नंतर देऊ असे त्याने पटेलला सांगितले. नंतर हा प्रकार खोटा असून फसवणूक झाल्याचे पटेलच्या लक्षात आले. त्याने याबाबत बीकेसी (वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही टोळी तोतया पोलीस बनून अनेकांना अशा प्रकारे फसवत होती.
तोतया पोलिसांचा नाट्यमय पाठलाग..
बीकेसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या तोतया पोलिसांचा शोध सुरू केला. या टोळीतील आरोपी सांताक्रूझच्या कलिना येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवार, २ जून रोजी सापळा रचला. मात्र खरे पोलीस आल्याची कुणकूण या तोतया पोलिसांना लागली. आरोपी आपले वाहन सोडून पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पळून जाणाऱ्या चौघांपैकी तिघांना पकडण्यात यश मिळवले. मोहम्मद चौधरी (३३), तरबेज कुरेशी (३९) आणि प्रदीप थोरात (३७) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात बीकेसी, घाटकोपर, नवघर आदी विविध पोलीस ठाण्यात अशा प्रकारे फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील चौथ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.