मुंबई : दादरचा कबुतरखाना बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईवरून जैन समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. या कारवाईमुळे जैन समाज भाजपवर नाराज असून ही नाराजी समाजमाध्यमांवरून उघड होऊ लागली आहे. विकासकांच्या दबावाखाली राज्य सरकार हा निर्णय घेत असल्याचा आरोप जैन समाजातील नागरिक करू लागले आहेत.

कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखान्याविरोधात कारवाई सुरू केली. त्यातही दादरच्या कबुतरखान्यावर या कारवाईचा विशेष भर आहे. या कारवाईवरून आधीच जैन समाजात नाराजीचे वातावरण पसरले होते. कारवाईच्या विरोधात पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरोधात फौजदारी तक्रारी दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे मुंबई महापालिकेच्या कारवाईला बळ मिळाले आहे. त्यामुळे शनिवारी रात्री मुंबई महापालिकेने कबुतर खान्यावर आच्छादन घातले आहे. कबुतरांना खाद्य घालण्यास या पद्धतीने मज्जाव केल्यामुळे जैन समाजातील नाराजी वाढली आहे.

कबुतरखान्याच्या वरील घुमट आधीच पालिकेने हटवलेले होते त्यातच आता कबुतरखान्यांमध्ये खाद्य देणे बंद झाल्यामुळे या परिसरातील कबुतरे मात्र सैरावैरा उडत आहेत. त्यामुळे परिसरातील दुकानांच्या छतावर, झाडांवर, इमारतींवर कबुतरांचे थवेच्याथवे बसलेले दिसत आहेत. कबुतर खान्यावर कर लावा आम्ही तो पण भरू….. शनिवारी रात्री कबुतरखान्यावर आच्छादन घालण्यासाठी आलेल्या पालिकेच्या पथकाला या परिसरातील जैन समुदायाने विरोध केला. त्यावेळी जैन समाजातील लोकांनी राज्य सरकारवर तोंडसुख घेतले. त्याची एक ध्वनिचित्रफित समाज माध्यमांवर फिरते आहे.

दादर कबुतरखान्याच्या आजूबाजूला अनेक लोक ४० वर्षांपासून राहत आहेत त्यांना श्वसनाचे कोणतेही आजार झालेले नाही मग हा शोध कोणी लावला असा सवाल या नागरिकांनी केला आहे. दारू पिणारे, गुटखा खाणारे लोक चालतात पण कबुतरांना खाद्य घातलेले का चालत नाही असा सवालही त्यांनी केला आहे. विकासकांच्या दबावाखाली सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारला कर हवा असेल तर त्यांनी कबुतरखान्यावर कर लावावा आम्ही जैन लोक तो कर पण भरू असाही खोचक सल्ला या नागरिकांनी दिला आहे.

भाजप हटाव भारतीय संस्कृती बचाव

शिवसेना भाजप महायुती सरकारने कबुतरखाना हटवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप हटाव भारतीय संस्कृती बचाव असा मेसेजही समाजमाध्यमांवरून फिरत आहे. समाज माध्यमावरून कबुतरखाना हटवण्याच्या मोहीमेचे स्वागतही होत असून दोन्ही बाजूनी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.