यंदा कोणतीही करवाढ नाही! निवडणुकीच्या तोंडावर पालिकेकडून मुंबईकरांना दिलासा | BMC Budget Mumbai civic body presents Rs 52619 crore Budget for FY’24 | Loksatta

BMC Budget : यंदा कोणतीही करवाढ नाही! निवडणुकीच्या तोंडावर पालिकेकडून मुंबईकरांना दिलासा

मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज (४ फेब्रुवारी) सादर करण्यात आला.

BMC Budget
मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज (४ फेब्रुवारी) सादर करण्यात आला. (PC : Indian Express and Twiter/mybmc)

मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज (४ फेब्रुवारी) सादर करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी तब्बल ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. आयुक्त म्हणाले की, “पहिल्यांदाच महापालिकेने ५० हजार कोटींपेक्षा मोठा अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षी महापालिकेने ४५,९४९.२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये यंदा १४.५ टक्के वाढ झाली झाली आहे.”

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईकरांवर करवाढीचा बोजा टाकणं टाळलं. या बातमीने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी २७,२४७.८० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी म्हणजेच कोस्टल रोडसाठी ३,५४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचे प्रस्ताविले आहे.

महापालिकेच्या पेटाऱ्यात काय?

कोस्टल रोडसाठी ३,४५४ कोटी रुपयांची तरतूद
शिक्षण विभागाचं बजेट ३,३४७ कोटी रुपये
गोरेगाव-मुलुंड रस्त्यासाठी १,०६० कोटी रुपये
रस्ते सुधारणाांसाठी २,८२५ कोटी रुपयांची तरतूद
पर्जन्य जलवाहिन्यांसाठी २,५७० कोटी
वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यासाठी १६८०.१९ कोटी रुपये इतकी तरतूद प्रस्तावित
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेच्या विस्तारासाठी ५० कोटी
किटकनाशके आणि फॉगिंग मशीन्ससाठी ३५ कोटी रुपये
असंसर्गजन्य आजारांसाठी १२ कोटी, शीव योग केंद्रासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित
बजेटपैकी ५२ टक्के रक्कम विकासावर खर्च होणार : आयुक्त

हे ही वाचा >> BMC Budget : आरोग्यासाठी यंदा १६८०.१९ कोटी रुपये तरतूदीचा प्रस्ताव

पालिकेचं पार्किँग अ‍ॅप येणार!

दरम्यान, मुंबई महापालिकेने नवे प्रकल्प हाती घेण्याऐवजी सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला आहे. मुंबई महापालिका नागरिकांच्या सोयीसाठी पार्किँग अ‍ॅप विकसित करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 14:23 IST
Next Story
“विश्वासघात विश्वासातील माणसाकडूनच होतो हे अजित पवारांनाही माहिती, त्यांना…”, संजय राऊतांचं वक्तव्य