मुंबई : स्वतःच्या आरोग्यासाठी कष्ट करण्यासारखा अन्य कोणताही आनंद नाही. चांगले आरोग्य कमावणे ही आयुष्याच्या दृष्टीने पूरक बाब आहे. म्हणूनच मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे. मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या सेवा-सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी केले.
‘फिट मुंबई’ पुढाकारांतर्गत ‘फिट सॅटर्डे’ मोहीम आज (२५ ऑक्टोबर २०२५) वांद्रे किल्ला उद्यान सुरू झाली, त्यावेळी गगराणी हे बोलत होते. व्यायाम न करणाऱ्यांना ‘फिट सॅटर्डे’ मोहिमेमुळे नियमित व्यायाम करण्याची प्रेरणा मिळावी, हा या मोहिमेचा उद्देश आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश, उपआयुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे, सहायक आयुक्त (एच – पश्चिम) दिनेश पल्लेवाड, सहायक आयुक्त (के – पूर्व) नितीन शुक्ला, तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
“स्वतःच्या आरोग्यासाठी नियोजन, विचार आणि इच्छा असणे ही समृद्ध आरोग्याची किल्ली आहे. त्यामुळे कोणतीही कारणे न देता स्वतःच्या आरोग्यासाठी श्रम घेण्याची तयारी असली पाहिजे. कोणतीही सबब न देता आपण दैनंदिन जीवनात स्वतःच्या आरोग्यासाठी नियमित वेळ द्यायलाच हवा. नियमित व्यायाम केल्यास मानसिक, भावनिक आणि शारीरिक तंदुरुस्ती राखली जाते. म्हणूनच आपले जीवन आनंदाने आणि ऊर्जेने जगण्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे. या मोहिमेचे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होतानाच मुंबईकरांनी मोहिमेला बळ द्यावे,” असे आवाहन गगराणी यांनी केले.
महानगरपालिका आरोग्यसेवा क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करते. नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी नियमित वेळ दिल्यास महानगरपालिकेच्या आरोग्य अर्थसंकल्पात मोठी बचत होऊ शकते. आजार-प्रतिबंधासाठी उत्तम आरोग्य आणि नियमित व्यायाम यासाठी प्रत्येक वयोगटातून पुढाकार आवश्यक असल्याचेही गगराणी यांनी नमूद केले.
‘एल अँड टी – महापालिका कोस्टल रोड हाफ मॅरेथॉन’चे आयोजन
“फिट मुंबई” या अभियानाचे घोषवाक्य ‘फिटनेस दिल से’ असे आहे. प्रत्येक मुंबईकराच्या फिटनेस प्रवासाला नवी दिशा देत, मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाअंतर्गत जागतिक दर्जाचा सायकलिंग ट्रॅक, नयनरम्य विहार क्षेत्र (प्रोमेनेड) अशा उत्कृष्ट सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर फिटनेसचा संदेश प्रसारित करण्याच्या उद्देशाने १४ डिसेंबर २०२५ रोजी ‘एल अँड टी – महापालिका कोस्टल रोड हाफ मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) आणि फिट इंडिया मूव्हमेंट यांच्या सहकार्याने पार पडणार आहे. हा वार्षिक उपक्रम दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आयोजित करण्यात येईल.
मोहीमेच्या निमित्ताने उपक्रम:
प्रत्येक शनिवारी सकाळी ६.३० वाजता उद्याने आणि मैदानांवर फिटनेस सत्रांचे आयोजन.
सर्व वयोगटांसाठी चालणे, जॉगिंग आणि योग सत्रे.
विभागीय स्तरावर स्थानिक पातळीवर फिटनेस व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून फिटनेस सत्रांचे आयोजन.
शिवयोग केंद्राच्या माध्यमातून योग, ध्यानधारणा आणि प्राणायाम सत्रांसाठी समन्वय.
आरोग्य व मानसिक स्वास्थ्य याविषयी माहिती, शिक्षण आणि संवाद मोहिमेद्वारे जनजागृती करणे व नागरी सहभाग वाढवणे.
शाळकरी तसेच महाविद्यालयीन तरुणांसाठी शारीरिक व्यायाम सत्रांचे आयोजन करणे. कमी वयातच व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्पर्धांचे आयोजन करणे.
