करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशभरात आणि राज्याप्रमाणेच मुंबईत देखील करोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईत २० हजार रुग्ण रोज आढळले, तर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सूतोवाच केले होते. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संभाव्य लॉकडाऊनविषयी भिती आणि चिंतेचं वातावरण होतं. मात्र, आता खुद्द पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीच यासंदर्भात लॉकडाऊनची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतली सध्याची परिस्थिती पाहाता मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, असं आयुक्त चहल यांनी स्पष्ट केलं आहे. एबीपीशी बोलताना त्यांनी याबाबतची पालिका प्रशासनाची नेमकी भूमिका मांडली आहे.

“मुंबईत काल (गुरुवारी) २० हजारच्या वर केसेस झाल्या. त्यापैकी फक्त ११० लोक ऑक्सिजन बेडवर गेले. ११८० लोक रुग्णालयात दाखल झाले. ३५ हजार पैकी फक्त ५९९९ बेड भरले आहेत. ८४ टक्के बेड रिकामे आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर नगण्य आहे, बेड रिकामे आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही लॉकडाऊनची गरज नाही”, असं इक्बालसिंग चहल म्हणाले.

काय असावेत लॉकडाऊनचे निकष?

“३० डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी आमची आढावा बैठक घेतली. ओमायक्रॉन, तिसरी लाट याबाबत पुढील उपाययोजनांवर चर्चा झाली. काही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा विचार करण्याची भूमिका मांडली. पण मी सांगितलं की पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे मापदंड पॉझिटिव्हिटी होते. पण आत्ता मुंबईतले १८६ रुग्णालय, ३५ हजार बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचे निकष बदलून पॉझिटिव्हीटी ऐवजी पहिला निकष म्हणजे रुग्णालयात किती बेड रिकामे आहेत आणि दुसरा निकष म्हणजे ऑक्सिजनचा वापर किती होतोय असे करावेत”, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

आता आकड्यांचं महत्त्व राहिलेलं नाही

“आता रुग्णांच्या आकड्याला महत्त्व राहिलेलं नाही. हॉस्पिटलची, ऑक्सिजनच्या वापराची, ऑक्सिजन बेडची स्थिती काय आहे, हे महत्त्वाचं आहे. रुग्णसंख्या कमी असतानाही ऑक्सिजनचा किंवा आयसीयूचा वापर वाढला, तर आपण निर्बंधांचा विचार करू. रुग्णसंख्या कमी-जास्त होत असेल, तर त्याचा फरक पडत नाही. आज २० हजार ४०० रुग्णसंख्या झाली आहे. काल ६४ हजार चाचण्या केल्या होत्या, आज ७२ हजार चाचण्या केल्या आहेत. पण आता आकड्यांवर लॉकडाऊन होऊ शकत नाही”, असं आयुक्त म्हणाले.

“२१ डिसेंबरला आपल्याकडे पॉझिटिव्हिटी रेट वाढायला सुरूवात झाली. १६ दिवसांत मृत्यूचा आकडा १९ आहे. म्हणजे सरासरी दिवसाला एक मृत्यू आहे. आपल्याकडे रुग्णांची संख्या १ लाखाच्या वर गेली आहे, पण मृत्यू सरासरी एकच आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार अतिरिक्त निर्बंधांची गरज नाही”, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका; WHO च्या प्रमुखांचा इशारा, म्हणाले “रुग्णालयात दाखल आणि मृत्यू…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई लोकलवर निर्बंध नाहीत, कारण…

“मुंबई लोकलमधून ६० लाख लोक प्रवास करत आहेत. सगळे दुहेरी लस घेतलेले आहेत. त्यामुळे तिथे निर्बंध घालण्याची गरज नाही. पुढे जे काही होईल, त्यावर आमचं बारीक लक्ष आहे. सर्व यंत्रणांचं हेच म्हणणं पडलं, की सध्या अतिरिक्त निर्बंधांची गरज नाही”, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं.