मुंबई : महापालिका भूखंडावरील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांपैकी २१ पैकी १५ योजनांमध्ये उच्चतम निविदा सादर झाल्याने विकासक निश्चित झाले आहेत. भूखंड अधिमूल्यापोटी किमान २५ टक्क्यांपेक्षा अधिक टक्के अधिमूल्य देणाऱ्या विकासकाची नियुक्ती करण्याचे महापालिकेने ठरविले असून विकासकांनी दीडशे टक्क्यांपर्यंत अधिमूल्य देऊ केले आहे. अन्य सहा योजनांमध्ये पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या विकासकांना पाचारण करुन चर्चेद्वारे अंतिम विकासक निश्चित केला जाणार आहे.

मुंबईतील रखडलेल्या २२८ झोपु योजनांपैकी ७८ योजनांची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली होती. या ७८ पैकी ६३ योजनांसाठी सुरुवातीला महापालिकेने जाहीर नोटिस जारी करुन विकासकांकडून स्वारस्य पत्र मागविले होते. यापैकी अंतिमतः ४७ योजना कार्यान्वित करण्याचे पालिकेने निश्चित केले. एकूण ९६ विकासकांनी या योजना पूर्ण करण्यात रस दाखविला. मात्र त्यापैकी २६ योजनांमध्ये प्रत्येकी एका विकासकाने रस दाखविला. त्यामुळे या योजनांसाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे. अखेर २१ योजनांमध्ये विकासक निश्चित करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे.

या विकासकांनी २५ ते १५० टक्के इतके अधिमूल्य पालिकेला देऊ केले आहे. या विकासकांनी पुनर्वसनाच्या इमारती मोफत बांधून देण्याबरोबरच या योजनेतील झोपडीवासीयांचे दोन वर्षांचे आगावू भाडे व त्यापुढील वर्षाचे धनादेश द्यावयाचे आहेत. अशी अट पाळणाऱ्या विकासकांना अंतिम केले जाणार आहे. तसा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे पाठवला जाणार असून त्यांच्या मंजुरीनंतरच विकास अंतिम होईल, असे या योजनेची जबाबदारी सांभाळणारे उप मुख्य अभियंता उमेश बोडखे यांनी सांगितले.

पुढील योजनांमध्ये विकासक निश्चित – श्री साईबाबा, जोगेश्वरी पूर्व (सरोज लँडमार्क), हरिओम, विलेपार्ले (सेठ नाईन स्प्लेंडर एलएलपी), साईबाबा नगर, अंधेरी पूर्व (लब्धी लाईफस्टाईल आणि सिरोया कॉर्प), महावीर धाम, बोरिवली पश्चिम (रुपारेल इन्फ्रा अँड रिअल्टी), साई समर्थ, बोरिवली पश्चिम (सेठ नाईन स्प्लेंडर एलएलपी), सिंधुनगरी, प्रभादेवी (सरोज लँडमार्क), ओम शिवशक्ती मरिअम्मा नगर, सायन कोळीवाडा (श्रीराज डेव्हलपर्स), विजय नगर, सायन (श्रीराज डेव्हलपर्स), एव्हरेस्ट- मूनलाईट-केजीएन, विक्रोळी पार्कसाईट (रुपारेल इन्फ्रा अँड रिअल्टी), नेहरु नगर, महालक्ष्मी आणि राधाकृष्ण, गणेश नगर, सर्व पहाडी गोरेगाव (डीजीएस टाऊनशिप), संत रोहिदास जागृती सेवा संघ, गोरेगाव पूर्व (डीजीएल टाऊनशिप), आणि अशोक नगर रहिवासी व्यापारी संस्था, गोरेगाव पूर्व (स्कायलार्क बिल्डकॉन).

पुढील योजनांत विकासक चर्चेनंतर निश्चित होणार – सहयोग (दोन्ही जोगेश्वरी पूर्व), अजित नगर (सर्व बोरिवली पश्चिम), साई आदर्श (वडाळा),मुलुंड पंचशील, (मुलुंड पश्चिम), आजाद नगर, पहाडी गोरेगाव पश्चिम (चांडक रिअल्टॉर्स), श्री गणेश युवा जनसेवा, गोरेगाव पूर्व.