मुंबई : लोकवस्तीपासून ५०० मीटर लांब जागा शोधून तेथे कबुतरखाने सुरू करता येतील का याची मुंबई महापालिकेतर्फे चाचपणी सुरू आहे. मात्र नव्या कबुतरखान्यांसाठी मुंबई अशा जागाच नसल्याचे आढळून आले आहे. लोकवस्तीपासून लांब अशा जागा शोधून अहवाल सादर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांना आदेश दिले होते. मात्र बहुतांशी विभाग कार्यालयांनी अशा जागा नसल्याचा अहवाल दिला आहे.
कबुतरखाने बंद करण्याबाबतचा वाद न्यायालयात पोहोचला असून त्याला राजकीय वळणही आले आहे. त्यामुळे कबुतरखाने सुरू करायचे झाल्यास लोकवस्तीपासून ५०० मीटर अंतरावर कबुतरखाने तयार करता येतील का याची चाचपणी मुंबई महापालिका करीत आहे. अशा जागा विभाग स्तरावर शोधल्या जात आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी सहाय्यक आयुक्तांना कबुतरखाने सुरू करण्याकरीता योग्य जागा शोधण्याचे आदेश दिले होते. तसेच त्याबाबतचा अहवाल गुगल शीटवर भरून देण्यास सांगितले होते. मात्र संध्याकाळी उशीरापर्यंत बहुतांशी विभाग कार्यालयांनी अशा जागा नसल्याचाच अहवाल दिल्याचे समजते.
मुंबई प्रत्येक भाग अत्यंत गजबजलेला असून आधीच अत्यंत दाटीवाटीने या ठिकाणी लोक राहतात. त्यामुळे लोकवस्तीपासून ५०० मीटर अंतर दूर या निकषात कोणत्याही विभागात जागा सापडणे अवघड आहे. काही विभाग कार्यालयांंनी अशा जागा शोधल्या आहेत, मात्र त्यावर आरक्षण आहे का हे देखील तपासून बघावे लागणार आहे.
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने दुसऱ्याच दिवशी दादरच्या प्रसिद्ध कबुतरखान्यावर कारवाई केली होती. कबुतरखान्याच्या वरील अनधिकृत बांधकाम हटवले, तसेच कबुतरांसाठी जमा केलेले खाद्यही हटवले. पालिकेच्या या कारवाईच्या विरोधात काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने कबुतरखाना बंद करण्यासंबंधी आदेश दिले होते. या प्रकरणाचा वाद अद्याप संपलेला नसून पुन्हा पुन्हा हा विषय डोके वर काढत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात एका जैन मंदिरालगत नवीन कबुतरखाना सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या कबुतरखान्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्येक विभागात असे कबुतरखाने सुरू करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
रेसकोर्स, आरे कॉलनीत कबुतरखाने ?
कबुतरांच्या विषयावर न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन लोढा यांनी यापूर्वी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्राद्वारे केले होते. बीकेसी, रेसकोर्स, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या मोकळ्या जागांवर कबुतरांना खाद्य घालण्यासाठी सुरक्षित व नियंत्रित आहार क्षेत्र म्हणून निश्चित करावे, अशीही मागणी त्यांनी केली होती.