मुंबई : मुंबई महापालिकेने सध्या आस्थापना खर्चात काटकसरीचे धोरण अवलंबले असून स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दोन अतिरिक्त वेतववाढी रोखण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. १९२६ पासून सुरू असलेले हे अभ्यासक्रम बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेतनवाढ रोखण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कामगार सेनेने केली आहे. तसेच या प्रकरणी संघटनेने स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक डॉ. जयराज फाटक यांचीही भेट घेऊन हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट या केंद्रीय संस्थेकडून १९२६ पासून संपूर्ण देशात स्थानिक व राज्य पातळीवरील लोक कारभारात सुव्यवस्था यावी, तसेच सुप्रशासन सुरळीतपणे चालविण्यासाठी प्रशासनातील कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. स्थानिक स्वराज्य पदविका (LSGD) अभ्यासक्रम अनेक वर्षांपासून सुरू आहे. संस्थेच्या स्थापनेपासून (१९२६) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम चालवले जात आहेत.

हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वेतनवेढ मुंबई महापालिकेकडून दिल्या जात होत्या. यंदाही या अभ्यासक्रमासाठी अनेक कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र जुलै २०२५ पासून हे दोन अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याला कामगार सेनेने विरोध केला असून पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना याबाबत पत्र पाठवले आहे.

पालिका प्रशासनाने हा निर्णय घेताना, औद्योगिक कलह कायदा १९४७ अन्वये बदलाबाबत कलम ९ अ नुसार संबंधितांना सूचना देणे क्रमप्राप्त होते. तथापि, तसे केले गेले नाही. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी पालिकेचे ना हरकत घेऊन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्यांचे नुकसान होणार आहे, असे मत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पत्रात म्हटले आहे. मुंबई महापालिकेत सध्या महापौर व विविध समित्या अस्तित्त्वात नसल्यामुळे काही वरिष्ठ अधिकारी आपल्या मर्जीनुसार निर्णय घेऊन महापालिका आयुक्तांची मंजुरी घेत असतात ही बाब गंभीर आहे, असे कदम यांनी सांगितले.

हे दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या, तसेच अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरील अतिरिक्त वेतनवाढ चालू ठेवावी, अशी मागणी कामगार सेनेने केली आहे. दरम्यान हे दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची बंद केलेली वेतनवाढ पुन्हा सुरू करण्यासाठी संघटनेने स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक आणि माजी महापालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांची भेट घेतली असून या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती त्यांना करण्यात आली. फाटक हे लवकरच या प्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती कामगार नेते डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी दिली.