मुंबई : शहरातील १२ उपनगरीय रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागासाठी मुंबई महानगरपालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र निविदा प्रक्रियेला चार वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदार मिळत नसल्याने प्रशासनाची अडचण झाली आहे.

नव्याने काढण्यात आलेल्या निविदेत निकषांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर आकारण्यात येणाऱ्या दंडात्मक तरतुदीची रक्कम १० पट वाढवल्यामुळे कंत्राटदारांना निविदा भरण्यात स्वारस्य नसल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी निकषांची पूर्तता न केल्यास किंवा डॉक्टर गैरहजर राहिल्यास आकारण्यात येणाऱ्या एक हजार रुपये दंडाची रक्कम आता एक लाख रुपये करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील सेवा ही कंत्राटदारामार्फत पुरविण्यात येते. त्यानुसार १२ रुग्णालयातील १५३ रुग्णशय्यांसाठी महानगरपालिकेने १० जुलै रोजी निविदा काढली होती. त्यावेळी फक्त एकाच कंपनीने त्यात स्वारस्य दाखविले होते.

मात्र फक्त एकच कंपनीने स्वारस्य दाखविल्याने महानगरपालिकेने निविदा भरण्यासाठी तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र निविदा प्रक्रियेसाठी अन्य कोणत्याच कंपनीकडून स्वारस्य दाखविण्यात येत नसल्याने महानगरपालिकेवर दोन महिन्यांत चार वेळा निविदेची तारीख वाढविण्याची नामुष्की आली. यामागील मुख्य कारण दंडाची रक्कम १० पटीने वाढवण्याने प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी अतिदक्षता विभागात रुग्णसेवेत हयगय, अपुरे मनुष्यबळ, शैक्षणिक अहर्तेचे निकष पूर्ण न करणे, डॉक्टर गैरहजर असण्याचे प्रकार घडल्यास कंत्राटदारांना ठोठावण्यात येणारा दंड हा अत्यल्प होता. मात्र नव्या अटीनुसार या दंडाची रक्कम १० पटीने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागासाठी काढण्यात आलेल्या निविदेला चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

दंडाची रक्कम किती आहे?

यापूर्वी कंत्राटदाराकडून निविदेतील निकषाची पूर्तता न केल्यास एक हजार रुपये दंडाची तरतूद होती. मात्र ती आता १० हजार रुपये करण्यात आली आहे. तसेच ही चूक १० पेक्षा जास्त वेळा झाली तर दंडाची रक्कम प्रति पाळी १० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

३३ कोटी रुपये खर्च

मुंबई महानगरपालिका कंत्राटी सेवा देणाऱ्यांच्या माध्यमातून ५० रुग्णशय्येचे अतिदक्षता विभाग यशस्वीरित्या चालवत आहे. नव्याने काढण्यात आलेल्या निविदेत १५३ रुग्णशय्येसाठी भूलतज्ज्ञ, शल्यचिकित्सक इत्यादी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे. दोन वर्षांच्या करारावर महापालिका प्रशासन प्रति रुग्णशय्येसाठी दररोज ३ हजार ३६७ रुपये खर्च करणार आहे. १२ उपनगरीय रुग्णालयांमध्ये १५३ अतिदक्षता विभागातील रुग्णशय्येसाठी ३३ कोटी ५ लाख ५ हजार २०० रुपये खर्च करणार आहे.

या प्रमुख रुग्णालयांमधील रुग्णशय्यांसाठी कंत्राट

  • भाभा, वांद्रे- १२ रुग्णशय्या
  • व्हीएन देसाई, सांताक्रूझ- १० रुग्णशय्या
  • सावित्रीबाई फुले, बोरिवली – १० रुग्णशय्या
  • शताब्दी रुग्णालय, कांदिवली – १४ रुग्णशय्या एमआयसीयू आणि १६ रुग्णशय्या एसआयसीयू
  • भाभा, कुर्ला – १० रुग्णशय्या ईएमएस, १० रुग्णशय्या एमआयसीयू
  • राजावाडी, घाटकोपर – ११ रुग्णशय्या
  • शताब्दी, गोवंडी – १० रुग्णशय्या
  • एमडब्ल्यू देसाई, मालाड – १० रुग्णशय्या
  • भगवती, बोरिवली – १० रुग्णशय्या
  • मुक्ताबाई, घाटकोपर- १० रुग्णशय्या
  • के.एम.जे.फुले, विक्रोळी- १० रुग्णशय्या
  • एमटी अग्रवाल, मुलुंड – १० रुग्णशय्या