मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी प्रवीण परदेशी

मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यावर अवघ्या ४५ दिवसांमध्येच यूपीएस मदान यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याने  मुख्य सचिवपदी अजोय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली. तर मेहता यांच्या जागी  मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मदान यांनी अल्पावधीतच पद सोडल्याने तर्कवितर्काना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात खांदेपालट केले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत उपयुक्त ठरतील अशा अधिकाऱ्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मदान यांची मार्चच्या अखेरच्या आठवडय़ात मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. मदान हे ऑक्टोबर अखेर निवृत्त होणार होते. पण तडकाफडकी त्यांनी दोन दिवसांपूर्वी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आणि सरकारने तात्काळ मंजूरही केला. मुख्य सचिवपदी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांचे सचिव म्हणून काम केलेल्या मेहता यांना प्रशासनाचा चांगलाच अनुभव आहे. शरद पवार यांचेही काही काळ विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी प्रशासनाची खंबीर साथ हवी असल्यानेच मेहता यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. मदान हे नियमावर जरा जास्तच बोट ठेवणारे अधिकारी  होते. ही बाब त्यांना अडचणीची ठरली असावी.

मेहता यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली. परदेशी हे गेली साडेचार वर्षे मुख्यमंत्र्यांचे सचिव होते. मुंबईत शिवसेनेला शह देणे आणि पालिकेचा कारभार अधिक लोकाभिमूख करण्याच्या उद्देशानेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासातील परदेशी यांना पसंती दिल्याचे समजते. मेहता हे सप्टेंबर अखेरीस निवृत्त होत असले तरी तेव्हा राज्य विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असेल. यामुळेच त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळू शकते.

मदान निवडणूक आयुक्त ? मुख्य सचिवपदाची मुदत संपण्यास पाच  महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना मदान यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करल्याने त्यांचे मुख्यमंत्र्यांशी सूर जुळले  नसावेत, अशी मंत्रालयात कुजबूज आहे. मुख्य सचिवपद सोडताना त्यांना भविष्यात चांगल्या पदाची हमी दिली असावी. मदान यांनी राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी अर्ज केला असून, सप्टेंबर महिन्यात हे पद रिक्त झाल्यावर त्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना पाच वर्षे संधी मिळेल. नवीन नियुक्ती होईपर्यंत त्यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार आणि ‘सिकॉम‘चे अध्यक्ष या पदांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.