मुंबई : कांदिवली येथील चारकोप भागातील रस्त्यांवर जागोजागी फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळाला आहे. सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि परिसरात रोगराई पसरण्याचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने या परिसरात उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या स्वच्छता कामगारांनी दररोज संबंधित भागातील कचरा उचलण्यावर भर दिला आहे. तसेच, दिवसभरात ठराविक वेळी परिसरात स्वच्छता कामगारांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच, परिसरात कचऱ्याचे डबेही ठेवण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.
चारकोप परिसरात नागरी वस्तीसह उद्योग वसाहतीही आहेत. तसेच, येथील बहुतांश रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे पूर्वीपासूनच दूरवस्था झालेल्या रस्त्यांची कचऱ्यामुळे आणखी वाईट अवस्था झाली आहे. अनेक नागरिक रस्त्यावर कचरा फेकतात. महापालिकेकडून त्या कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. नागरिकांनी याबाबत महापालिका, लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, कचऱ्याची समस्या सुटलेली नाही.
उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या जनता दरबार या उपक्रमात चारकोपमधील नागरी समस्या मांडण्यात आल्या. त्यांनतर गोयल यांनी महापालिका अधिकारी व पोलिसांना विविध सूचना केल्या. संबंधित परिसरात महापालिकेकडून नियमित स्वच्छता केली जात आहे. तसेच, दिवसभरात ठराविक वेळांनी परिसरात स्वच्छता कामगारांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून त्यादरम्यान रस्त्यावर कचरा आढळल्यास तातडीने त्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. परिणामी, नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गोयल यांच्या जनता दरबारात पदपथांवर मद्यसेवन करणाऱ्यांच्याही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली असून चारकोप पोलीस ठाण्यातर्फे संबंधित परिसरात नियमित लक्ष ठेवण्यात येत आहे. चारकोपसह आकुर्ली रोडवरही महापालिकेने ठराविक वेळांनी स्वच्छता कामगारांच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. तसेच, चारकोपमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेऊन त्या ठिकाणी कचऱ्याचे डबे ठेवण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.