मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांनी, कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या कालावधीत मुंबईत निर्माण झालेल्या सुमारे तीन हजार मेट्रिक टन अतिरिक्त कचऱ्याचे निर्मूलन केले. घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र सेवा बजावत मुंबई स्वच्छ ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली स्वच्छतेची मोहीम राबवण्यात आली होती. नियमित स्वरूपात दररोज सरासरी ६,९०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. मात्र दिवाळीच्या काळात म्हणजे १८ ते २१ ऑक्टोबरदरम्यान प्रतिदिन ७,३०० मेट्रिक टनांहून अधिक कचरा गोळा करण्यात आला.
कचऱ्यातील वाढ दररोज सुमारे ६०० ते ७०० मेट्रिक टनांनी झाली. या कालावधीत एकूण ३,०७५ मेट्रिक टन अतिरिक्त कचऱ्याचे प्रभावीपणे निर्मूलन करण्यात आले. यापैकी सुमारे २,०७५ मेट्रिक टन कचऱ्याची कांजूर व देवनार क्षेपणभूमी येथे विल्हेवाट लावण्यात आली, तर सुमारे एक हजार मेट्रिक टन कचरा वाहतूक केंद्रांवरून उचलण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, पालिकेकडून वेळोवेळी विशेष स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर, निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे निर्मूलन तसेच योग्य व्यवस्थापन करून सणासुदीच्या काळात मुंबई अधिक स्वच्छ राखण्याचे निर्देश प्रशासनाकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. तसेच, नागरिकांनाही स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा बजावत सणासुदीच्या काळात ३ हजार मेट्रिक टनांहून अधिक कचऱ्याचे व्यवस्थापन केले. तसेच, मुंबईकर नागरिकांनीही या काळात स्वच्छतेच्या अनुषंगाने सहकार्य केले आहे, असे उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी या संपूर्ण कार्यवाहीबाबत बोलताना सांगितले.
