मुंबई – मुंबई शहराला सांभाळण्यास जड झालेले, नको असलेले किंवा स्थलांतर करायचे प्रकल्प मुलुंडमध्ये ढकलण्याचा प्रशासकीय शिरस्ता कायम असून आधी प्रकल्पबाधितांसाठीची घरे मग धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांसाठी घरे, मग नवीन कबुतरखाना आणि आता भटक्या श्वानांसाठी निवारे यासाठी मुलुंड पूर्व परिसरातील जागाच निवडण्यात आल्या आहेत.
मुलुंड पूर्व परिसरातच एकापाठोपाठ एक प्रदूषणकारी प्रकल्प येत असल्यामुळे मुंबईचा भाग असूनही सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना मुंलुंडकरांमध्ये निर्माण झाली आहे.
शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बस थांबे आणि रेल्वे स्थानके अशा संस्थात्मक क्षेत्रात भटक्या श्वानांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे या ठिकाणाहून श्वानांना हटवून निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ७ नोव्हेंबरला दिले होते. मुंबईत सुमारे लाखभर भटके कुत्रे असून त्यांच्याकरीता मुंबई महापालिकेकडे पुरेसे निवारे उपलब्ध नाहीत.
मुंबईत अद्याप केवळ आठच निवारे आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यात श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने व श्वानांच्या निवाऱ्यांचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली होती. त्यात श्वान निर्बीजिकरण कार्यक्रम अधिक व्यापक करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
तसेच १००० श्वानांसाठी मुलुंड पूर्वमध्ये एक निवारा शाकारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मुलुंडमध्ये श्वानांसाठी निवारा बांधण्यास मुलुंडकरांनी विरोध दर्शवला आहे. अशा प्रकल्पांमुळे मुलुंडकरांना आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात. तसेच मुलुंडची एक विशिष्ट सांस्कृतिक ओळखच पुसली जाईल, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुलुंडमध्ये निरनिराळे प्रकल्प येऊ घातले आहेत. मुंबई महापालिकेतर्फे या भागात प्रकल्पबाधितांची घरे बांधली जाणार आहेत, तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांची घरेही बांधली जाणार आहेत. या प्रकल्पांना विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते ऍड. सागर देवरे म्हणाले की, प्रकल्पबाधितांसाठी तब्बल साडे सात हजार घरांचा प्रकल्प, मग मिठागरांवर धारावीकरांसाठी घरे, त्यानंतर कबुतरखाना आणि आता १००० कुत्रे ठेवण्यासाठी निवारा हे सर्व मुलुंडमध्ये आणि तेही पूर्वेलाच कशाला हवे. या सरकारने मुलुंडकरांना गृहित धरले आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
मुलुंड पूर्वेला ये जा करण्यासाठी पर्यायी मार्ग नाही, सावरकर रुग्णालयाची अवस्था बिकट आहे, स्थानकाजवळील वाहनतळ बंद आहे अशा अनेक समस्या असताना सुविधा देण्या ऐवजी एक एक विनाशकारी प्रकल्प मुलुंडकरांच्या माथी मारले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
दरम्यान, याबाबत मुलुंडमधील भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे म्हणाले की, कबुतरखाने किंवा श्वान निवारे ही समाजाची गरज आहे. मुलुंडमध्येच काय कुठेही हे प्रकल्प उभारताना लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी ही आमची मागणी आहे.
