इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : पश्चिम उपनगरातील नागरिकांसाठी दोन तरण तलाव खुले झाले आहेत. दहिसर आणि मालाड येथील या तलावांचे उदघाटनाशिवाय लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या दोन्ही तलावात पोहायला सुरुवात केली आहे. मुंबईत पालिकेचे सध्या एकूण सहा तरण तलाव आहेत. आणखी सात ठिकाणी जलतरण तलाव बांधण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे तलाव नागरिकांसाठी खुले करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यापैकी मालाड पश्चिम आणि दहिसर पश्चिम येथील तरण तलाव १ एप्रिलपासून खुले करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> घाटकोपर येथून बांग्लादेशी नागरिकाला अटक; भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबईत पालिकेचे सध्या एकूण सहा तरण तलाव आहेत. त्यापैकी दादर, कांदिवली, दहिसर आणि चेंबूर येथील तरण तलाव पालिकेमार्फत चालवले जातात.  तर मुलुंड येथील प्रियदर्शिनी क्रीडा संकुल आणि अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव हे एका संस्थेला चालवण्यासाठी देण्यात आले आहेत. आणखी सात नवीन तलावांपैकी चार तलाव पश्चिम उपनगरात असतील तर शहर भागात दोन आणि पूर्व उपनगरात एक तलाव असेल. त्यापैकी दहिसर (पश्चिम) येथील कांदरपाडा परिसरातील जलतरण तलाव आणि  मालाड (पश्चिम) येथील चाचा नेहरु मैदानजवळच्या जलतरण तलावाचे लोकार्पण झाले आहे.

हेही वाचा >>> मुंबई : त्या संशयीत बोटीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

आणखी कुठे होणार तरण तलाव अंधेरी (पश्चिम) येथील गिल्बर्ट हिल जलतरण तलाव, अंधेरी (पूर्व) येथील कोंडिविटा गाव जलतरण तलाव, वरळी येथील वरळी जलाशय टेकडी जलतरण तलाव, विक्रोळी (पूर्व) येथील टागोर नगर जलतरण तलाव आणि वडाळा येथील वडाळा अग्निशमन केंद्र जलतरण तलाव या ७ ठिकाणी नवीन जलतरण तलाव बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तलाव बांधून पूर्ण झाल्यानंतर व लोकार्पण झाल्यानंतर तेथील सभासद नोंदणी प्रक्रिया देखील सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती  महानगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.  यापैकी वडाळा येथील अग्निशमन केंद्रातील जलतरण तलाव हा सध्या अग्निशमन केंद्राच्या अखत्यारीत असून येत्या काळात त्याचे नूतनीकरण करून तो देखील जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc swimming pools at dahisar and malad open for citizens numbai print news zws
First published on: 03-04-2023 at 14:41 IST