मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांवर दोन दिवसांपासून सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत गुरुवारी २७७ हरकती आणि सूचनांवर सुनावणी झाली.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. या अंतर्गत २२ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यावर २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. या प्रारूप रचनेसंदर्भात प्राप्त सूचना व हरकतीपैकी २७७ हरकती आणि सूचनांवर गुरुवारी सुनावणी पार पडली.
बुधवारी म्हणजेच सुनावणीच्या पहिल्या दिवशी १८९ सूचना व हरकतींवर सुनावणी झाली होती. या दोन्ही दिवसांची मिळून एकूण ४६६ हरकती व सूचनांवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर, उर्वरित हरकती व सूचनांवर शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यासाठी हरकतदार नागरिकांनी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात सुनावणीसाठी प्रत्यक्षात उपस्थित रहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
दुसऱ्या दिवशीच्या सुनावणीला महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले प्राधिकृत अधिकारी म्हणून राज्याचे अपर मुख्य सचिव (गृह) इकबाल सिंह चहल उपस्थित होते. तसेच, महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सह आयुक्त (निवडणूक आणि कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार आणि सहायक आयुक्त (कर निर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.