मुंबई : एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाला गुरुवारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई विमानतळानजीक झालेल्या अपघातामुळे बोइंग विमान कंपनीचा सुरक्षा इतिहास नव्याने चर्चेत आला आहे. दुर्घटनाग्रस्त विमान हे बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर प्रकारातील होते. गेल्या काही वर्षांमध्ये बोइंग कंपनीच्या विमानांचे किमान दोन अपघात मोठी मनुष्यहानी घडवणारे ठरले होते.
बिघाडांची मालिका
बोइंग-७८७ ड्रीमलायनर प्रकारातील विमानाला झालेला हा पहिला मोठा अपघात आहे. यापूर्वी २०१३ आणि २०२४मध्ये विमानात तांत्रिक बिघाडाच्या घटना आढळून आल्या. यात २०१३मध्ये जानेवारी महिन्यात ७ ते १६ तारखांदरम्यान अनेक विमानांच्या लिथियम-आयन विद्युत संचांमध्ये बिघाड होत असल्याचे आढळून आले. सात जानेवारी रोजी जपान एअरलाइन्सच्या विमानात ते बॉस्टन विमानतळाअंतर्गत धावपट्टीवर उभे असताना विद्युत विभागात एका संचाला आग लागली.
दोनच दिवसांनी युनायटेड एअरलाइन्सच्या एका विमानात याच स्वरूपाचा बिघाड नोंदवण्यात आला. १६ जानेवारी रोजी जपानच्या निप्पॉन एइरलाइन्सच्या विमानात विद्युत विभागामध्ये धूर येत असल्याचे आढळल्यामुळे ते तातडीने नजीकच्या विमानतळावर उतरवावे लागले. जपान एअरलाइन्स आणि निप्पॉन एअरलाइन्सने त्यांच्याकडील बोइंग-७८७ विमानांची उड्डाणे स्थगित केली.
पाठोपाठ अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने चौकशीचे आदेश देत सर्वच बोइंग-७८७ विमानांची उड्डाणे स्थगित केली. अशा प्रकारे एखाद्या कंपनीच्या विशिष्ट विमानांची सर्व उड्डाणे स्थगित होण्याची ती ३४ वर्षांतील पहिलीच घटना होती. बोइंग कंपनीच्या अभियंत्यांनी विमाने उड्डाणसिद्ध करताना पुरेशी तांत्रिक खबरदारी घेतली नाही, तसेच फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशननेही उड्डाण प्रमाणपत्र देताना काही बाबी तपासल्या नाहीत, असा निष्कर्ष चौकशी अमेरिकी काँग्रेससमोरील सुनावणीनंतर काढण्यात आला होता.
११ मार्च २०२४ रोजी चिलीच्या एका विमान कंपनीचे विमान ऑस्ट्रेलियातील सिडनी येथून चिलीची राजधानी सँटियागो येथे निघाले. दोन तासांनी न्यूझीलंडजवळ हे विमान अचानक ३०० फूट खाली आले. विमानातील वस्तू आणि व्यक्ती इतस्ततः फेकल्या गेल्या. या घटनेत ५० जण जखमी झाले.
बोइंग-७३७ मॅक्सचे अपघात
छोट्या विमानांना जगभरात वाढती मागणी असताना आणि या स्पर्धेत युरोपच्या एअरबस कंपनीचे ए-३२० विमान बाजी मारत असताना, बोइंग कंपनीने त्यांच्या बोइंग-७३७ विमानात सुधारणा करून बोइंग-७३७ मॅक्स हे नवीन विमान बाजारात आणले. पण सुधारणा सदोष असल्याचे २०१८मधील इंडोनेशिया आणि २०१९मधील इथियोपियात झालेल्या अपघातांनी दाखवून दिले. या दोन दुर्घटनांमध्ये मिळून ३४६ जणांना प्राण गमवावे लागले. पुन्हा एकदा अमेरिकेच्या काँग्रेससमोर बोइंगची सुनावणी झाली. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विमान सुरक्षेच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोइंगने तडजोड केली का, यावर भर देण्यात आला. ही चौकशी अजून पूर्ण झालेली नाही.
ट्रम्प प्रशासनाचे अभय
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अलीकडेच बोइंगशी वाटाघाटी करून बोइंग-मॅक्स प्रकरणी या कंपनीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होणार नाही, अशी हमी दिली. हे एक प्रकारे बोइंग कंपनीला अभयच दिल्यासारखे होते. वास्तविक जो बायडेन प्रशासनाने एक अमेरिकी कंपनी असूनही बोइंगची चौकशी कसून केली होती आणि कठोर कारवाईचीही तयारी चालवली होती. पण ट्रम्प प्रशासनाने गुन्ह्याची तीव्रता कमी केली. मृतांच्या नातेवाईकांनी याविरोधात दाद मागण्याचे ठरवले आहे.