सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांसह सोलापूर पोलीस आयुक्तांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी धारेवर धरले. या पोलिसांना तात्काळ अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
निवासी डॉक्टरला मारहाणीची मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी गंभीर दखल घेत तात्काळ सुनावणी घेतली होती. तसेच तपासाची सूत्रे स्थानिक पोलिसांकडून काढून घेत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या हाती सोपवत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यांच्याकडून आरोपींवर डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार नव्याने अतिरिक्त गुन्हा दाखल करण्याऐवजी काहीच कारवाई न झाल्याने न्यायालयाने अवमानप्रकरणी तपास अधिकाऱ्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच एवढे होऊनही काहीच कृती न करणाऱ्या सोलापूर पोलीस आयुक्तांनाही न्यायालयात हजर राहून खुलासा करण्याचे बजावले होते.
त्यानुसार सोलापूर पोलीस आयुक्त शुक्रवारी न्यायालयात हजर झाले. परंतु या वेळीही आपल्या आदेशांची अंमलबजावणी झालेली नसल्याचे कळल्यावर न्यायालयाने थेट पोलीस आयुक्तांनाच धारेवर धरले. सीसीटीव्हीतील मारहाणीच्या चित्रणात पोलिसांनी दखलपात्र आणि गंभीर गुन्हा केल्याचे दिसत असताना कारवाईसाठी कुणाच्या आदेशाची वाट पाहिली जात आहे, कारवाई न करण्यासाठी कुणी आदेश देत आहे का, असा सवाल न्यायालयाने त्यांना केला. मात्र त्यावर त्यांना कुठलेच समाधानकारक उत्तर देता आले नाही.
दरम्यान, मुख्य आरोपी असलेल्या पोलिसाकडून या वेळी हस्तक्षेप याचिका करण्यात आली. आपल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती या पोलिसाने करीत ‘त्या’ दिवशी नेमके काय झाले हे कथन करताना आपल्या कारकीर्दीत या पूर्वी कधीच अशी घटना घडली नसल्याचा दावा केला. तसेच घटनेच्या दिवशी रुग्णालयाचा कारभार कसा गलथान होता याचीही माहिती दिली.