मुंबई : गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाततून निवडून आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) नेते अनंत बी. नर यांच्या आमदारकीला आव्हान देणारी अपक्ष उमेदवाराची याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली. चुकीच्या पद्धतीने याचिका केल्याबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्याला साडेतीन लाख रुपये दंड म्हणून न्यायालयात जमा करण्याचे आदेशही दिले.
नर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी निवडणूक याचिका अपक्ष उमेदवार रोहन साटोणे यांनी केली होती. या याचिकेवर नुकतीच न्या. अभय अहुजा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, चुकीच्या पद्धतीने याचिका केल्याचे निरीक्षण नोंदवून नर यांनी वकिलांवर केलेल्या खर्चाची त्यांना परतफेड करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, याचिकाकर्त्याला साडेतीन लाख रुपये दोन आठवड्यांच्या आत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत नर यांनी ७७,०४४ मतांनी विजय मिळवला होता. नर यांनी शिवसेनेच्या मनीषा वायकर (एकनाथ शिंदे) यांचा १,५४१ मतांनी पराभव केला होता. याचिकाकर्ता साटोणे हे अपक्ष उमेदवार होते, यावर्षी ४ जानेवारी रोजी त्यांनी याचिका दाखल केली होती, त्यानंतर इतर उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्या. सुनावणीदरम्यान, नर यांच्या वतीने उपस्थित वकील अमित कारंडे यांनी याचिकेतील मूलभूत त्रुटींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
सुनावणीदरम्यान प्रत्येकवेळी साटोणे यांच्या वतीने वकील अनुपस्थित राहून, बदली वकीलही उभा केला नाही अथवा काही ना काही कारण पुढे करून सुनावणीसाठी पुढील तारीख मागत होते. वारंवार असे घडल्यानंतर प्रतिवादी नर यांना याचिकेला उत्तर देण्यासाठी झालेला खर्च परत मिळण्याचा अधिकार असल्याचा दावा करून हा खर्च याचिकाकर्त्यावर लादण्यात यावा, अशी मागणी नर यांच्या वतीने करत ॲड. कारंडे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
त्यानंतर २३ जून रोजी साटोणे यांच्या वतीने वकील सुरभी अग्रवाल या हजर राहिल्या आणि निवडणूक याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. त्यावर नाराजी व्यक्त करून न्यायालयाने प्रतिवादींचे वकील कारंडे यांच्या खर्चाच्या मागणीची दखल घेऊन नर यांनी वकिलांवर केलेल्या साडे तीनलाख रुपयांच्या खर्चाची त्यांना परतफेड करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आणि त्यांची याचिका फेटाळून लावली.