मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाला आणखी १४ नबे न्यायमूर्ती मिळाले आहेत. या चौदाही न्यायमूर्तींना उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी मंगळवारी अतिरिक्त न्यायमूर्तीपदाची शपथ दिली.

हे चौदाही न्यायमूर्तींची वकील वर्गातून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची न्यायमूर्तींपदी नियुक्ती करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती. न्यायमूर्तीपदी नियुक्ती झालेल्यांमध्ये सिद्धेश्वर ठोंबरे, मेहरोज खान पठाण, रणजितसिंह भोसले, संदेश पाटील, श्रीराम शिरसाट, हितेन वेणेगावकर, रजनीश व्यास, राज वाकोडे, नंदेश देशपांडे, अमित जामसांडेकर, आशिष चव्हाण, वैशाली पाटील जाधव, आबाश्वब शिंदे आणि फरहान दुभाष यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे हितेन वेणेगावकर, आशिष चव्हाण, संदेश पाटील आणि श्रीराम शिरसाट हे चौघे सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांची उच्च न्यायालयात दाखल अनेक प्रकरणांत बाजू मांडत होते. वेणेगावकर हे उच्च न्यायालयात मुख्य सरकारी वकील म्हणूनही पदभार सांभाळत होते. तर वाकोडे हे सरन्यायाधीश यांचे नातेवाईक असल्याचे पुढे आले होते.