मुंबई : आजीचे नातवाशी असलेले भावनिक नाते हे तिला त्याचा ताबा स्वत:कडे ठेवण्याचा अधिकार देत नाहीत. किंबहुना, मुलांवर त्यांच्या पालकांचाच अधिकार अधिक असतो, असे स्पष्ट करून पाच वर्षांच्या नातवाचा ताबा त्याच्या आई-वडिलांकडे देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने वृद्धेला दिले.

या वृद्धेला जुळे नातू आहेत. परंतु, एक नातू सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त असल्याने त्याची नीट काळजी घेता यावी यासाठी वृद्धेचा मुलगा आणि सुनेने त्यांच्या दुसऱ्या मुलाला तिच्याकडे सोपवले होते. त्यामुळे, वृद्ध महिलाच नातवाची काळजी घेत होती. तथापि, ती आणि तिच्या मुलामध्ये मालमत्तेवरून वाद झाला. त्यानंतर, पाच वर्षांच्या मुलाला आपल्याकडे परत देण्याची मागणी वृद्धेच्या मुलाने तिच्याकडे केली. तिने त्याला नकार दिल्याने मुलगा आणि सुनेने मुलाचा ताबा परत मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने उपरोक्त टिप्पणी केली. तसेच, नातवाचा ताबा मुलगा आणि सुनेकडे देण्याचे आदेश वृद्धेला दिले.

वृद्धेने मुलगा आणि सुनेच्या याचिकेला विरोध केला. तसेच, ती जन्मापासूनच नातवाची काळजी घेत आहे आणि त्यांच्यात एक भावनिक नाते आहे, असा दावा केला व नातवाचा ताबा देण्यास नकार दिला. तथापि, आजीचे मुलाशी भावनिक नाते समजण्यारखे आहे. मात्र, अशा आसक्तीमुळे मुलाचा ताबा मिळवण्याचा जैविक पालकांचा अधिकार डावलता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, जैविक पालकांकडे बाळाचा ताबा देणे मुलाच्या कल्याणासाठी हानिकारक आहे हे सिद्ध होते, तेव्हाच बाळावरील त्यांचे अधिकार नाकारले जातात, असेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.

आजीला कोणताही कायदेशीर अधिकार नाही

या प्रकरणात मुलाच्या पालकांमध्ये कोणताही वैवाहिक वाद नाही आणि वडील सरकारी नोकरी करतात. शिवाय, ते बाळाची काळजी घेण्यास असमर्थ आहेत हे दाखविणारे काहीही नाही. त्यामुळे, केवळ वृद्ध आईशी असलेल्या वादामुळे मुलाला त्याच्या पालकांचे प्रेम, काळजी नाकारता येणार नाही किंवा कायदेशीर अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही, याउलट, आजीला तिच्या नातवाचा ताबा देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, विशेषतः ती ७४ वर्षांची असेल तर नातवाला तिच्या ताब्यात देण्याचा प्रश्नच उद््भवत नसल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले.

मुलांचे कल्याण सर्वोच्च

अल्पवयीन मुलांचा ताबा मिळवण्याच्या प्रकरणांत मुलाचे कल्याण हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने आदेशात अधोरेखीत केले. तसेच, याचिकाकर्ते, जैविक आई-वडील आणि नैसर्गिक पालक असल्याने मुलाला त्याचा ताबा घेण्याचा निर्विवाद कायदेशीर अधिकार आहे, असे नमूद करताना मुलगा आणि सून जुळ्या मुलांची काळजी घेण्यास भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या असमर्थ असल्याचा वृद्धेचा दावा न्यायालयाने फेटाळला. तसेच, या आरोपांच्या आधारे मुलाला आई-वडिलांच्या ताब्याते देणे नाकारता येत नसल्याचा पुनरूच्चारही न्यायालयाने

केला. न्यायालयाने वृद्धेला दोन आठवड्यांत नातवाचा ताबा त्याच्या आई-वडिलांकडे देण्याचे आदेश दिले. त्याचवेळी, याचिकाकर्त्यांनी मुलाला त्याच्या आईला भेटू देण्याचे आदेशही दिले.