मुंबई : अवचित पडलेल्या पावसाने हवेचा दर्जा सुधारला, त्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे, पावसाचे आभार माना, असा टोला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी लगावला. त्याचबरोबर हवा प्रदूषणाच्या बाबतीत ‘दिल्लीकर’ होण्याऐवजी ‘मुंबईकर’च राहू या, अशी टिप्पणी करीत खंडपीठाने फटाके वाजवण्याचा कालावधी आणखी एक तासाने घटवण्याचा निर्णय जाहीर केला.    

प्रदूषण कमी झाले असले तरी काही भागांत हवेचा दर्जा वाईट असून परिस्थिती अद्यापही गंभीरच आहे, असे स्पष्ट करून फटाके वाजवण्याचा कालावधी आणखी एका तासाने कमी करण्यात येत असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. त्यामुळे, मुंबई महानगर प्रदेशात दिवाळीच्या काळात सायंकाळी ७ ते रात्री १० ऐवजी, रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवण्याची परवानगी असेल. 

मुंबईत फटाके वाजवण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. हवा प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीकर होण्याऐवजी मुंबईकरच राहू या, अशी टिप्पणीही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या विशेष खंडपीठाने केली.

हेही वाचा >>> हवा प्रदूषण रोखण्याबाबत महापालिका कृतिशून्य; उच्च न्यायालयाचे खडेबोल

दिवसेंदिवस खालावणारा हवेचा दर्जा लक्षात घेऊन मुंबई आणि मुंबई महानगरप्रदेशात दिवाळीच्या काळात सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत फटाके वाजवण्यासाठी न्यायालयाने गेल्या आठवडय़ात परवानगी दिली होती. मात्र, शुक्रवारी न्यायालयाने परिस्थिती म्हणावी तशी सुधारलेली नसल्याचे नमूद करून ही वेळ एक तासाने कमी केली.

सध्या आपण एका आपत्कालिन आणि गंभीर स्थितीत राहत आहोत. ही स्थिती सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. परंतु हे राज्य सरकार आणि महापालिकेचे कर्तव्य आहे. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करून सरकार आणि महापालिका कोणावर उपकार करत नाही, असा टोलाही न्यायालयाने लगावला. सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देशात रासायनिक फटाक्यांच्या वापरावर बंदी घातली असून त्याचे पालन करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचे न्यायालयाने नमूद केले. एवढय़ावरच न थांबता, उत्पादन स्तरावरच किंवा बाजारात हे फटाके विकले जातात तेव्हा ते तपासण्याची यंत्रणा आहे का? अशी विचारणाही न्यायालयाने केली.

तज्ज्ञ समिती नियुक्त

वायू प्रदूषणाची समस्या केवळ या वर्षभरापुरती मर्यादित नाही, ती पुन्हा उद्भवणार असल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. गेल्या काही दिवसांपासून श्वसन विकारांनी त्रस्त रुग्णांनी रुग्णालये भरली आहेत. त्यामुळे, प्रदूषणाचे नेमके स्वरूप काय आहे, याचा अभ्यास करण्यात आला आहे का? हवेत फक्त धूळ आहे की त्यात काही रासायनिक घटकही आहेत, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, प्रदूषणाचे स्त्रोत शोधून त्याचा अभ्यास करण्यासाठी न्यायालयाने तज्ज्ञांची समितीही नेमली.

महापालिकेच्या निष्क्रियतेवर ताशेरे

मुंबई : गेल्या वर्षीपासून हवेच्या प्रदूषणाच्या समस्येला मुंबईकर सामोरे जात आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी मार्चमध्ये मुंबई महापालिकेने नियम केले होते. या समस्येची तीव्रता वाढत जाणार हे तेव्हापासून माहीत होते, तरीही पालिका प्रशासनाने काहीच केले नाही, अशा शब्दांच उच्च न्यायालयाने शुक्रवारी महापालिकेच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले.