‘बीएनएचएस’चे पाच दशकांचे संशोधन ग्रंथबद्ध * जागतिक जैवविविधता दिन विशेष
मुंबई : इवलीशी दिसणारी चिमणी अगदी कझाकिस्तानपर्यंत स्थलांतर करते किंवा संकटग्रस्त प्रजातीच्या यादीमधील मोठा जलरंक पक्षी अगदी रशियातून महाराष्ट्राच्या पालघरमध्ये येऊ न विसावतो, हे सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र गेल्या पाच दशकांहून अधिक काळ ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’तर्फे (बीएनएचएस) सुरू असलेल्या भारतीय पक्ष्यांच्या स्थलांतराच्या अभ्यासातून त्यांच्या दूरवर प्रवासाच्या अचंबित करणाऱ्या मार्गाचा उलगडा झाला आहे.
मुख्य म्हणजे भारतामध्ये स्थलांतर करणाऱ्या परदेशी पक्ष्यांच्या मार्गामध्ये महाराष्ट्राची किनारपट्टी आणि येथील पाणथळे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे. त्यामुळे येथील सागरी किनारपट्टी आणि पाणथळे परदेशी पक्ष्यांची जैवविविधता जपण्यासाठी पोषक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘इंडियन बर्ड मायग्रेशन अॅटलास’ या ‘बीएनएचएस’कडून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये भारतीय पक्ष्यांच्या स्थलांतराच्या पट्टय़ांचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. १९५९ ते २०१७ या कालावधीत रिंगिंग, उपग्रह यंत्र, नेक कॉलर आणि कलर टॅगिंग पद्धतीच्या आधारे करण्यात आलेल्या निरीक्षणाचे सार या पुस्तकात मांडले आहे. या कालावधीत परदेशी आणि भारतीय पक्ष्यांच्या स्थलांतराच्या मार्गाचा मागोवा घेण्यासाठी सुमारे ७ लाखांहून अधिक पक्ष्यांना रिंग करण्यात आले. त्यामध्ये भारतातून २९ देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्या तीन हजाराहून अधिक पक्ष्यांच्या स्थलांतर मार्गाचा उलगडा करण्यास संशोधकांना यश मिळाले आहे. यासाठी विविध देशांमधील पक्षीनिरीक्षक आणि अभ्यासकांशी समन्वय साधून या अभ्यासाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला असून यासाठी ‘बीएनएचएस’च्या एस. बालचंद्रन, तुहिना कट्टी आणि रंजित मनकाडन या शास्त्रज्ञांनी याचे संपूर्ण काम पाहिले आहे. स्थलांतरणाच्या पट्टय़ांच्या निरीक्षणाबरोबरच त्या-त्या देशांना नष्टप्राय होणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींच्या संवर्धनाची जाणीव करून देणे, असे या अभ्यासाचे उद्दिष्ट होते.
भारतातून स्थलांतर करणाऱ्या आणि परदेशातून महाराष्ट्राच्या कुशीत येऊन विसावणाऱ्या पक्ष्यांच्या रंजक प्रवासाची मार्गिका या अभ्यासातून उलगडली आहे. इराणमध्ये रिंग केलेला रोहित (फ्लेमिंगो) पक्षी महाराष्ट्रात येत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. इराणमधील पाणथळ नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांनी भारतामध्ये पर्यायाने महाराष्ट्रात प्रजननाच्या जागा शोधण्यास सुरुवात केल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. बहरिनमध्ये २००८ साली रिंग करण्यात आलेला लगाम सुरय पक्षी तीन महिन्यानंतर मुंबईत आढळला होता. तर त्याच ठिकाणाहून रिंग केलेला छोटा तुरेवाला सुरय पक्षी अर्नाळा येथे टिपण्यात आला आहे. शिवाय कझाकिस्तान आणि रशियामधील काळ्या डोक्याचा कुरव पक्षी महाराष्ट्रामध्येच येत असल्याचे निरीक्षण यामध्ये नोंदविण्यात आले आहे.
रिंगिंग म्हणजे काय?
या पद्धतीमध्ये पक्ष्याचा पायाला एक गोलाकार रिंग लावली जाते. त्यावर देशाचा किंवा संस्थेचा विशिष्ट सांकेतिक क्रमांक असल्याने स्थलांतरानंतर पक्ष्याच्या ठावठिकाण्याची अचूक माहिती मिळते. याशिवाय गेल्या दशकापासून पक्ष्यांना नेक कॉलर आणि कलर टॅगिंग करण्यात येत आहे. नेक कॉलरमध्ये पक्ष्याच्या मानेला सांके तिक क्रमाकांची पट्टी लावली जाते. तर कलर टॅगिंगमध्ये परिक्षेत्रानुसार रंग ठरवून त्या परिक्षेत्रातील पक्ष्यांना त्या रंगाची पट्टी लावली जाते. उदाहरणार्थ, दक्षिण भारतातील पक्ष्यांना काळ्या रंगाची आणि उत्तर भारतातील पक्ष्यांना पाढंऱ्या रंगाच्या दोन पट्टय़ा लावण्यात येतात. त्यामुळे अभ्यासकांना हा पक्षी कोणत्या भागातून आला आहे, हे समजणे सोपे जाते.
ठाणे खाडी आता फ्लेमिंगो अभयारण्य
ठाणे : मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकचे काम सुरू झालेले असताना महाराष्ट्र सरकारने ठाणे खाडीतील १६.९ चौरस किलोमीटरच्या भागाची फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून राजपत्रात अधिसूचना काढली आहे. मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकमुळे होणारी पर्यावरणाची हानी भरून काढण्यासाठी या अभयारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. फ्लेमिंगो अभयारण्य ठाणे खाडीच्या पश्चिमेकडील भागात असून त्यात मुलुंडचा १४३ हेक्टर, भांडुपचा ९५ हेक्टर, कांजुरमार्गचा २६५ हेक्टर, विक्रोळीचा २५७ हेक्टर आणि मंडाळेतील ३१ हेक्टर भागाचा समावेश आहे.
या अभ्यासात रशियातून ऑस्ट्रेलियात स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांसाठी महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी आणि पाणथळ जागा महत्त्वाची भूमिका बजावत आहे, हे समोर आले. पुढील टप्प्यात महाराष्ट्रातून परदेशामध्ये प्रवास करणाऱ्या पक्ष्यांवर अभ्यास होईल.
– तुहिना कट्टी, शास्त्रज्ञ, बीएनएचएस