फिरोजशहा मेहता यांच्या इशाऱ्याने प्रमाणवेळ धुडकावली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असणाऱ्या फिरोजशहा मेहता यांनी मुंबईत ‘स्टॅण्डर्ड टाइम’ (प्रमाणवेळ) लागू करण्याचा फतवा निघाला, तेव्हा ‘खबरदार ‘बॉम्बे टाइम’ बदलाल तर असा इशारा १९०६ मध्ये दिला. केवळ इशारा देऊन ते थांबले नाहीत तर म्युन्सिपाल्टीच्या सभेत मुंबईत ‘बॉम्बे टाइम’ कायम राहील, असा ठरावही मंजूर करवून घेतला.

देशात दोन वा त्याहून अधिक वेळविभाग असावेत का; असल्यास त्याचा काय परिणाम होईल, या विषयी केंद्रीय पातळीवर गांभीर्याने विचार सुरू आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाला तपशीलवार अभ्यास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर फिरोजशहा मेहता यांच्या कार्याची ही नोंद उद्बोधक आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या काही आठवणी ‘लोकमान्य’ दैनिकात सदर स्वरूपात लिहिल्या होत्या. प्रबोधनकार ठाकरे यांच्या एकसष्ठीनिमित्त ‘प्रबोधनकार ठाकरे सत्कार समितीने’ ‘जुन्या आठवणी’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. त्या पुस्तकात ही नोंद आहे.

‘स्टॅण्डर्ड टाइम’ सुरू होण्याआधी मुंबईत मद्रास आणि मुंबई अशा दोन वेळा सुरू होत्या. काही सरकारी कचेऱ्या आणि व्यापारी कंपन्या ‘मुंबई टाइम’ तर काही ‘मद्रास टाइम’ पाळत असत. १९०६ मध्ये ‘स्टॅण्डर्ड टाइम’चा बूट निघाला तेव्हा फिरोजशहा मेहता यांनी मुंंबई महापालिकेपुरता तरी मुंबई टाइम कायम ठेवण्याचा निश्चय केला.

याची आठवण सांगताना प्रबोधनकार म्हणतात, ज्या दिवशी स्टॅण्डर्ड टाइम सुरू झाले त्या दिवशी मुंबईचे गव्हर्नर साहेब मुंबईतील सार्वजनिक घडय़ाळे पाहायला सकाळीच घोडागाडीतून बाहेर पडले. क्रॉफर्ड मार्केटच्या मनोऱ्यावरील घडय़ाळ जुन्याच ‘बॉम्बे टाइम’वर चालू होते. घोडागाडी थांबवून गव्हर्नरांनी ते घडय़ाळ प्रमाण वेळेनुसार ३९ मिनिटे पुढे करण्याचा हुकूम दिला. महापालिकेच्या नोकरांनी आदेशानुसार काटे पुढे सरकविले. काही वेळात फिरोजशहा मेहता यांची गाडी आली. घडय़ाळ पुढे केलेले पाहताच ते चिडले आणि त्यांनी तुम्ही नोकर महापालिकेचे की गव्हर्नरचे, म्युन्सिपाल्टीच्या मालकीच्या संस्थांची घडय़ाळे बदलण्याचा गव्हर्नरला काय अधिकार, ‘मुंबई टाइम’ हे ‘मुंबई टाइम’ आहे, प्राण गेला तरी ते मी बदलू देणार नाही’ अशा शब्दात खडसावले आणि चला ओढा काटे मागे, खबरदार मुंबई टाइम बदलाल तर, असा सज्जड दम भरला. इतकेच नव्हे तर त्याच दिवशी दुपारी महापालिकेच्या सभेत आक्रमक भाषण करीत ‘मुंबई टाइम’ कायम ठेवण्याचा लोकमताचा ठराव मंजूर करवून घेतला. मुंबईतील ‘हिंदी पंच’ या अँग्लो गुजराथी साप्ताहिकाने एक विनोदी चित्र आपल्या साप्ताहिकातही प्रकाशित केले होते. क्रॉफर्ड मार्केटवरच्या घडय़ाळाचे काटे गव्हर्नर हाताने अलीकडे ओढत आहेत तर तोच काटा फिरोजशहा मेहता अगदी विरुद्ध दिशेने व दात-ओठ खात मागे खेचत आहेत. हेच चित्र लंडनच्या ‘रिव्ह्य़ू ऑफ रिव्ह्य़ूज’ या मासिकानेही प्रसिद्ध केले. ठाणे येथील तात्या फडके यांनी त्यांच्या ‘हिंदू पंच’ या पत्रात ‘मेहतानी सरकारची जिरविली’ असा लेख छापला. प्रबोधनकारांचे साहित्य असलेल्या ‘प्रबोधनकार डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळावरही ‘जुन्या आठवणी’त ही माहिती वाचायला मिळू शकेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay time issue in bmc pherozeshah mehta
First published on: 24-06-2017 at 03:19 IST