|| सुशांत मोरे
दीड लाख खारफुटींची झाडेही जाणार; प्रकल्पाचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अहवाल सादर
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम करताना जवळपास विविध प्रकारची ६० हजार झाडे तोडावी लागतील, असा अंदाज राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉपरेरेशन लिमिटेडने वर्तवला आहे.
प्रकल्पाचे काम करताना पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अहवाल कॉपरेरेशनने सादर केला असून वनस्पती आणि विविध प्रकारच्या झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच ठाणे, पालघरमधील दीड लाख खारफुटी झाडांवरही याचा परिणाम होणार आहे. मात्र प्रकल्पात बाधित होणारी झाडे आणि खारफुटीचे प्रमाण पाहता त्यापेक्षाही जास्त प्रमाणात ही झाडे, खारफुटी नव्याने लावण्यात येणार असल्याचा दावा राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉपरेरेशन लिमिटेडने केला आहे.
प्रकल्पाचे काम करताना होणारा आवाज, प्रदूषण आणि बुलेट ट्रेन धावल्यामुळे होणारा आवाज आणि त्याचा परिणाम याचीही माहिती अहवालात देण्यात आली आहे. विविध प्रकारच्या ६० हजार वनस्पती आणि झाडे कापली जाणार असून यामध्ये वनविभाग, शासकीय आणि खासगी जागांचाही समावेश आहे. १ लाख ५० हजार ७५२ खारफुटींची झाडेही तोडली जाणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल ते ठाणे (कोपरखैरणेचाही समावेश)असा बोगदा होणार असल्याने यात येथील खारफुटींच्या झाडांचा समावेश नाही. मात्र ठाणे तालुक्यातील म्हातार्डी, भारोडी, खारबाव, केवानी, दिवा, मालोदी तर पालघरमधील शिरगाव, गासकोपरी, वैतरणी खाडी, जलसरमधील खारफुटींवर गदा येणार आहे. जवळपास हा १९ हेक्टरचा खारफुटींचा परिसर प्रकल्पात येणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सध्या जमीन संपादनामुळे चर्चेत आहे. शेतकऱ्यांच्या जाणाऱ्या जमिनी, त्यांना मिळणारा मोबदला अशा अनेक कारणांमुळे शेतकरी आणि लोकप्रतिनिधींकडून प्रकल्पाला विरोध होत आहे. प्रकल्पाच्या एकूण १,४३४ हेक्टरपैकी अवघ्या ०.९ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे.
ठाणे येथे बुलेट ट्रेनसाठी बोगदा होणार असून या कामामुळे खारफुटींच्या झाडांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्याशिवाय पालघर येथेही सात बोगदे होणार असून तेथेही झाडे किंवा खारफुटींच्या झाडांवर प्रभाव पडणार नाही. अन्य ठिकाणी काम करताना विविध प्रकारची झाडे, खारफुटी तोडली जाणार असली तरीही त्यापेक्षा जास्त प्रमाणात झाडे, खारफुटी लावण्यात येतील. ज्या ठिकाणी झाडांवर परिणाम होईल तेथे एकाच्या बदल्यात पाच झाडे लावली जातील किंवा बाधित होणारी झाडे अन्य ठिकाणी लावली जातील. खारफुटींची झाडे प्रकल्पात जाणार असली तरी खारफुटी पुन्हा लावण्यासाठी वनविभागाला पैसे दिले जाणार आहेत. सध्या वनविभाग आणि पर्यावरणाशी संबंधित अन्य विभागांकडून काही मंजुरी आवश्यक असून त्याची पूर्तता केली जात आहे. -अचल खरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉपरेरेशन लिमिटेड