मुंबई : देशातील कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून, त्यांना उच्चतम रुग्णसेवा उपलब्ध व्हावी यासाठी कर्करोग तज्ज्ञ परिचारिका घडविण्यासाठी कामा रुग्णालामध्ये पोस्ट बेसिक डिप्लोमा कोर्स इन ऑन्कोलॉजी नर्सिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे. हा पदविका अभ्यासक्रम २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाची क्षमता २० विद्यार्थ्यी इतकी असणार आहे. यामुळे प्रशिक्षित कर्करोग तज्ज्ञ परिचारिका उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
राज्यामध्ये असंसर्गजन्य आजार प्रतिबंधक राष्ट्रीय कार्यक्रम सुरू असून त्याअंतर्गत जिल्हा रुग्णालयामध्ये केमोथेरपी, रेडिओथेरपी, आणि दैनंदिन शुश्रुषा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मात्र सध्या आरोग्य विभागांतर्गत एकही कर्करोग तज्ज्ञ परिचारिका, तसेच ऑन्कोलॉजी परिचारिका पदविका प्रशिक्षण केंद्र कार्यरत नाही.
त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना उच्च दर्जाची रुग्णसेवा उपलब्ध व्हावी यासाठी प्रशिक्षित कर्करोग तज्ज्ञ परिचारिका घडविण्यासाठी कामा रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग हा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला होता.
हा अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळाने सरकारला प्रस्ताव सादर केला होता. याची दखल घेत कामा रुग्णालयाची सक्षमता तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला दिले होते. संचालनालयाने सक्षमता अहवाल सादर केल्याने सरकारने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासू हा अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
नव्याने सुरू करायच्या अभ्यासक्रमासाठी संलग्नीकरण प्राप्त झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच सरकारने मान्य केलेल्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असेही निर्देश वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने दिले आहेत. भारतीय परिचर्या परिषदेच्या मानकांनुसार संस्थेकडे सर्व आवश्यक शिक्षकवर्ग उपलब्ध असल्याची खातरजमा करून घ्यावी, असेही वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने स्पष्ट केले आहे
कोण प्रवेश घेणार ?
सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण (जीएनएम) किंवा बीएस्सी नर्सिंग उत्तीर्ण नोंदणीकृत परिचारिका या अभ्यासाक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमासाठी पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील परिचारिकांना संस्थास्तरावर प्रवेशास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार अन्य उमेदवारांना सीईटीमार्फत प्रवेश देण्यात येणार आहे.
शैक्षणिक शुल्कातून उचलणार खर्च
पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑनकोलॉजी नर्सिंग हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी येणारा खर्च व इतर खर्च उमेदवारांकडून जमा होणाऱ्या शैक्षणिक शुल्कातून भागविण्यात येणार आहे.