मुंबई : कामा रुग्णालयामधील कृत्रिम गर्भधारणा केंद्राअंतर्गत (आयव्हीएफ) ‘गर्भाशयात गर्भाधान’ (आययूआय) प्रक्रिया सुरू करण्यात आली असून मागील दीड वर्षांत २१ महिलांमध्ये कृत्रिम गर्भधारणा करण्यात यश आले आहे. यामुळे अनेक वर्षांपासून वंधत्वाचे आयुष्य जगणाऱ्या या जोडप्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला. जानेवारी ते ११ जून २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत नऊ महिला गर्भवती राहिल्या आहेत.

गर्भधारणेसाठी अक्षम असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व उपचार देता यावेत यासाठी ६ मार्च २०२४ रोजी कामा रुग्णालामध्ये कृत्रिम गर्भधारणा केंद्र सुरू करण्यात आले. वंधत्वावर उपचार करणारे कामा आणि अल्ब्लेस रुग्णालय हे राज्यातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले. कामा रुग्णालयात दररोज २० ते ३० रुग्ण गर्भधारणेच्या समस्यांशी संबंधित महिला उपचारासाठी येत आहेत.

आययूआय अंतर्गत उपचारासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, पालघर व रायगडसह राज्यातील विविध भागातून रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. दीड वर्षांमध्ये रुग्णालयामध्ये जवळपास ८०० हून जास्त महिलांनी बाह्यरुग्ण विभागात नोंदणी केली. गतवर्षीच्या तुलनेत मागील सहा महिन्यांत अधिक महिलांनी नोंदणी केली आहे.

गतवर्षी ४२२ महिलांनी बाह्यरुग्ण विभागात नोंदणी केली, तर यंदा जानेवारीपासून आतापर्यंत ३७९ महिलांनी नोंदणी केली आहे. गतवर्षी नोंदणी केलेल्या ४२२ रुग्णांपैकी १०० महिलांची निवड ‘आययूआय’ या प्रक्रियेसाठी करण्यात आली. यातील १२ महिलांमध्ये यशस्वी गर्भधारणा राहण्यास मदत झाली. त्याचप्रमाणे यंदा नोंदणी झालेल्या ३७९ महिलांपैकी ३५ जोडप्यांवर आययूआय उपचार करण्यात आले. यातील नऊ महिला गर्भवती राहिल्या आहेत.

खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च

खाजगी रुग्णालयामध्ये कृत्रिम गर्भधारणेसाठी लाखो रुपये खर्च येतो. त्यामुळे सामान्यांना हे उपचार परवडत नाहीत. मात्र कामा रुग्णालयातील आययूआय केंद्रामध्ये गरीब आणि मध्यमवर्गीय जोडप्यांना सवलतीच्या दरात उच्च दर्जाचे उपचार मिळत आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गतही उपचार केले जात आहेत. वंध्यत्वाचे वाढते प्रमाण लक्षात घेता हे केंद्र अनेक महिलांना मातृत्वाचा आनंद मिळवून देण्यात यशस्वी ठरत आहे, असे कामा रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्र प्रमुख आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आययूआय म्हणजे काय ?

आययूआय म्हणजे सहाय्यक प्रजनन क्रिया. ही प्रक्रिया गर्भधारणेसाठी मदत करते. यामध्ये तयार केलेली शुक्राणू गर्भाशयामध्ये थेट ठेवले जातात. त्यामुळे गर्भधारणा होण्याच्या शक्यतेत वाढ होते. आययूआयचा वापर बहुतांशी वंध्यत्व किंवा सौम्य प्रजनन समस्या असणाऱ्या जोडप्यांसाठी करण्यात येतो.